उस्मानाबादेत रक्ताचा तुटवडा !
By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-28T00:03:09+5:302014-07-28T00:56:50+5:30
उस्मानाबाद : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असले तरी मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबिरे घेण्याकडे सामाजिक संस्था, विविध कार्यालये यांनी पाठ फिरविली आहे.

उस्मानाबादेत रक्ताचा तुटवडा !
उस्मानाबाद : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असले तरी मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबिरे घेण्याकडे सामाजिक संस्था, विविध कार्यालये यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळेच सध्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन ५ ते ६ बॅग एवढाच रक्तसाठा उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही वेळा पेशंटला अॅडमिट करून घेऊन शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात दुर्घटना वा अपघात घडल्यास अशा जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. बहुतेक वेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते. या उद्देशानेच येथे रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. मात्र या रक्तपेढीच्या बाबतीत सध्या तरी रुग्णांना ‘असून अडचण नसून खोळंबा’ या म्हणीचाच प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे. येथील रक्तपेढीची क्षमता एक ते दीड हजार बॅगची असली तरी सरासरी विचार केला तर प्रतिदिन ३५ ते ४० बॅग रक्त लागते.
मागील पाच-सहा महिन्यापूर्वी रक्ताची फारशी चणचण भासत नव्हती. मात्र दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. अपघातग्रस्तांसाठी चार-पाच बॅग रिझर्व ठेवल्या जातात, असे रूग्णालयाकडून सांगण्यात येते.
दरम्यान, असे असले तरी अनेकवेळा संबंधित रूग्णाला आवश्यक ‘ग्रुप’चे रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा वेळी रूग्णांची परिस्थिती समजावून सांगून संबंधित रूग्णाला अॅडमिट करून घेऊन शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येते. रक्ताची तातडीची गरज असेल तर खाजगी पेढीतून आणावे लागते, असेही सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला पुढाकार
रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून शिबिरे घेण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयाने केले होते. त्यानुसार माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी शिबीर घेवून रक्त पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. त्यानुसार ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील राष्ट्रवादी भवन येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयेही उदासीन
येथील रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांना पत्र देऊन व प्रत्यक्ष भेटून रक्तदान शिबिरे घेण्यासाठी विनंती केली आहे. मात्र एकही महाविद्यालयाने शिबीर घेण्यास सहमती दिली नाही, असे रक्तपेढीच्या सूत्रांनी सांगितले.
शिबिरे घ्या, शिबिरे...
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या स्वाक्षरीने अनेक संस्था, महाविद्यालयांना पत्र दिली आहेत. मात्र अद्याप कोणीही शिबीर घेण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळेच रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शासकीय कार्यालयेही मागे
दोन वर्षापूर्वी उस्मानाबाद येथील पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. त्यानंतर एकदाही शिबीर झाले नाही.जिल्हा परिषदेतही कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत याबाबत चर्चाही होते. मात्र याबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अद्याप पुढाकार घेतलेला नाही.