मोबाइल हॅक करून तब्बल साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक; ओटीपी न येताच खाते साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:51 IST2026-05-14T19:50:40+5:302026-05-14T19:51:59+5:30

सायबर क्राईमचा नवा फंडा; OTP शिवाय बँक खाते साफ, एमआयडीसी वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार

Online fraud of Rs 6.5 lakhs by hacking mobile; Account cleared as soon as OTP did not arrive | मोबाइल हॅक करून तब्बल साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक; ओटीपी न येताच खाते साफ

मोबाइल हॅक करून तब्बल साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक; ओटीपी न येताच खाते साफ

वाळूज महानगर : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन आयडिया वापरल्या जात असताना एमआयडीसी वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मोबाइल फोन हॅक करून दोन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमधून, तसेच क्रेडिट कार्डद्वारे तब्बल ६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे ऑनलाइन व्यवहार करून सायबर भामट्याने एका नागरिकाची आर्थिक फसवणूक केली.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात फिर्यादीच्या मोबाइलवर कोणताही ओटीपी संदेश आला नसून, कोणतीही लिंकही उघडलेली नव्हती, त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाजगी नोकरदार नितीन दत्तात्रय पवार (४८, व्यवसाय , रा. बजाजनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी यांचा मोबाइल फोन सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. आरोपींनी फिर्यादीच्या एसबीआय बँकेच्या सेव्हिंग खात्यासह एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती वापरून परस्पर आर्थिक व्यवहार केले. सायबर भामट्यांनी एसबीआय क्रेडिट कार्डमधून ७५ हजार रुपये व ३० हजार रुपये, असे दोन व्यवहार करून १ लाख ५ हजार रुपये वळते केले. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ७५ हजार रुपयांचे सहा व्यवहार आणि ४५ हजार रुपयांचा एक व्यवहार करून तब्बल ४ लाख ९५ हजार रुपये काढले. याशिवाय एसबीआयच्या सेव्हिंग खात्यातून ७७ हजार ५०० रुपये काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६ लाख ७७ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे व्यवहार सुरू असताना फिर्यादीचे कोणाशीही फोनवर संभाषण झाले नव्हते. त्यांच्या मोबाइलवर कोणताही ओटीपी आलेला नव्हता, तसेच कोणतीही संशयित लिंक किंवा ॲप उघडण्यात आले नव्हते. त्यामुळे आरोपींनी अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करून मोबाइल व बँकिंग प्रणाली हॅक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी बँक खात्यांशी संबंधित माहिती, क्रेडिट कार्ड तपशील, ओटीपी, तसेच मोबाइलमध्ये असलेले ॲप्स आणि परवानग्यांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संशयास्पद व्यवहार दिसताच तत्काळ संबंधित बँक व सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title : मोबाइल हैक, ₹6.5 लाख की चोरी: ओटीपी नहीं मिला, खाता खाली

Web Summary : वालुज में, मोबाइल हैक करके बैंक खातों और क्रेडिट कार्ड से ₹6.77 लाख की चोरी की गई, ओटीपी के बिना। नितिन पवार ने धोखाधड़ी की सूचना दी, जिससे साइबर सुरक्षा चिंताएँ बढ़ गईं और पुलिस ने परिष्कृत हैकिंग विधियों की जाँच शुरू कर दी।

Web Title : Mobile Hacked, ₹6.5 Lakhs Stolen: OTP Not Received, Account Emptied

Web Summary : In Waluj, a mobile hack led to ₹6.77 lakhs stolen from bank accounts and credit cards without OTP. Nitin Pawar reported the fraud, raising cybersecurity concerns and prompting a police investigation into sophisticated hacking methods.