खासदारांची पुन्हा आयुक्तांना दूषणे
By Admin | Updated: August 22, 2014 00:19 IST2014-08-21T23:54:16+5:302014-08-22T00:19:24+5:30
औरंगाबाद : शिवसेना खा.चंदक्रांत खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या नावाने खडे फोडले.

खासदारांची पुन्हा आयुक्तांना दूषणे
औरंगाबाद : शिवसेना खा.चंदक्रांत खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या नावाने खडे फोडले. समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजना महापौर कला ओझा यांनी प्रशासनाला दम दिल्यामुळे आणि मी स्वत: केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. योजनेच्या कामात मनपातील काही अधिकाऱ्यांनीदेखील खोडा घालण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवाई ट्रस्टच्या इमारतीमध्ये सेनेच्या शहर, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दोन्ही योजनांचे भूमिपूजन व आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षातील सूत्रांकडून ही माहिती समजली.
२००६ पासून या योजनेसाठी पालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नसल्याचा अप्रत्यक्ष अर्थ खा.खैरे यांच्या स्पष्टीकरणातून झाल्याने अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे.
रविवारी १७ आॅगस्ट रोजी खा.खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही योजनांसाठी उपसलेल्या कष्टांची माहिती दिली. त्यावेळीही खा.खैरे यांनी आयुक्तांनी या दोन्ही योजनांमध्ये शून्य योगदान दिल्याचा आरोप केला होता.
मुळात आयुक्तांच्या मध्यस्थीमुळेच दोन्ही योजना मार्गी लागल्याचा सूर प्रशासकीय पातळीवर आळवला जात आहे. मात्र खा.खैरे यांनी महापौर व स्वत:कडे योजनेचे श्रेय घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. आठ वर्षांत ८ सभापती झाले. पाच आयुक्त मनपात आले. प्रत्येकाच्या काळात योजनांसाठी निर्णय झालाच आहे.
काळे झेंडे दाखविण्याचा इशारा
समांतर व भूमिगत गटार योजना १३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत आ.पंकजा पालवे यांचे नाव प्रमुख पाहुण्यांत टाकण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांचे नाव इतर आमदारांच्या यादीत आले तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजपाच्या या आक्रमक मागणीमुळे सेनेने आ.पालवे यांचे नाव प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्याचे ठरले आहे.
२३ रोजी सिद्धार्थमध्ये भूमिपूजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन होणार आहे. सिद्धार्थ उद्यानात औपचारिकरीत्या योजनांचा नारळ फुटणार आहे.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, आ. पंकजा पालवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट यांच्यासह मनपातील सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांची व युतीच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल.