शेंद्रा एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ २० किमी अंतरावरूनही दिसले, नागरी वस्ती रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:40 IST2026-04-29T10:40:04+5:302026-04-29T10:40:59+5:30
प्लास्टिकच्या कच्च्या मालाने घेतला पेट; करमाड पोलिसांचा फौजफाटा तैनात, बघ्यांची मोठी गर्दी.

शेंद्रा एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ २० किमी अंतरावरूनही दिसले, नागरी वस्ती रिकामी
करमाड (छ. संभाजीनगर):शेंद्रा एमआयडीसीतील डी सेक्टर, प्लॉट नंबर १६२ (गोकुळवाडी) येथे असलेल्या 'तिरुपती इंटरप्रायजेस' या प्लास्टिक दाणा निर्मिती कंपनीला आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या आवारात उघड्यावर असलेल्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आहे.
वस्तीला आगीचा धोका; घरे केली रिकामी
ज्या ठिकाणी ही कंपनी आहे, तो गोकुळवाडी परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. आगीची तीव्रता पाहून आजूबाजूची घरे तातडीने रिकामी करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दलाची शर्थीची झुंज
गेल्या तीन ते चार तासांपासून अग्निशमन दलाचे तीन बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी परिसरातील ५ ते ६ ट्रॅक्टर टँकर्सच्या मदतीने बंबांमध्ये पाणी भरले जात आहे. मात्र, प्लास्टिक असल्याने आग आटोक्यात येण्याऐवजी अधिकच धगधगत आहे. घटनास्थळी करमाड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.