दुबईतून ऑनलाइन लग्न अन् छ. संभाजीनगरात अत्याचार; श्रीमंतीचा बनाव रचणारा भामटा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:35 IST2026-04-20T17:30:57+5:302026-04-20T17:35:02+5:30

लग्नाचा कंटाळा आल्यानंतर आर्थिक घोटाळ्यात अटक झाल्याचे सांगून झाला पसार; बलात्काराचा गुन्ह्यात तरुणाला अटक

Man Arrested in Sambhajinagar for Rape After Faking Online Marriage from Dubai | दुबईतून ऑनलाइन लग्न अन् छ. संभाजीनगरात अत्याचार; श्रीमंतीचा बनाव रचणारा भामटा अटकेत

दुबईतून ऑनलाइन लग्न अन् छ. संभाजीनगरात अत्याचार; श्रीमंतीचा बनाव रचणारा भामटा अटकेत

छत्रपती संभाजीनगर : एका प्रशिक्षणादरम्यान ओळख झाल्यानंतर मोठ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचा मुलगा, श्रीमंत कुटुुंबातील भासवून एका तरुणाने तरुणीसोबत दुबईतून व्हिडिओकॉलवर ऑनलाइन लग्न केले. त्यानंतर शहरात येत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार दिला. याप्रकरणी शेख अब्दुल रहेमान अहेमद शेख रिजवान अहेमद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून जिन्सी पोलिसांनी त्याला अटक केली.

संगणकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची अब्दुल रहेमान सोबत एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. तेव्हा त्याने स्वत:ला उच्चशिक्षित भासवून त्याचे वडील एका प्रख्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, तरुणीला सहज तेथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तिच्यासोबत संवाद वाढवून तिच्या कुटुंबालाही विश्वासात घेत लग्नाचे आश्वासन दिले. जुलै, ऑगस्टमध्ये त्याने तरुणीसोबत विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ऑनलाइन लग्नाचा घाट
काही दिवसांनी अब्दुल रहेमान दुबईला गेला. तेथूनही तो तरुणीच्या संपर्कात होता. अचानक त्याने ऑनलाइन लग्न करण्याचा हट्ट करून लग्नही केले. नोव्हेंबरमध्ये शहरात परतल्यानंतर त्याने पुन्हा तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न केल्याचे कारण करत हैदराबादला नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. शहरात परतल्यानंतर मात्र त्याच्या घरच्यांनी तरुणीला स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय, तरुणीच्या कुटुंबानेदेखील लग्न झाल्याचे सांगून तरुणीला घरात घेण्यास नकार दिला.

गुन्ह्याचे केले नाटक
अब्दुल रहेमानने त्याच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. शिवाय, त्याला अटक होणार असल्याचे सांगून संपर्क बंद केला. जानेवारी महिन्यात जामिनावर सुटल्याचे सांगून पुन्हा तरुणीला भेटून तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या या बनावाला कंटाळून तरुणीने जिन्सी पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक केली.

Web Title: Man Arrested in Sambhajinagar for Rape After Faking Online Marriage from Dubai