जपानचे आंतरराष्ट्रीय पर्यटन कार्यालय औरंगाबादेत सुरू

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:26:13+5:302014-09-10T00:52:09+5:30

औरंगाबाद : जपान सरकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी झाले.

Japan's International Tourism Office will continue in Aurangabad | जपानचे आंतरराष्ट्रीय पर्यटन कार्यालय औरंगाबादेत सुरू

जपानचे आंतरराष्ट्रीय पर्यटन कार्यालय औरंगाबादेत सुरू

औरंगाबाद : जपान आणि भारत अंतर्गत पर्यटन व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या औरंगाबाद येथील इमारतीत जपान सरकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी जपानच्या प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यकारी संचालक हिरोयुकी त्स्युई उपस्थित होते.
९ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व वाकायामाचे राज्यपाल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पर्यटन व अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार झाला. त्यानुसार वाकायामा शासन व महाराष्ट्र शासन यांनी प्रचलित धोरण पद्धतीचा अवलंब करून पर्यटनाद्वारे परस्परांच्या आर्थिक विकासास चालना द्यावयाची आहे.
रोजगार निर्मितीसुद्धा करावयाची आहे. कराराचा एक भाग म्हणून अजिंठा- वेरूळ पर्यटक अभ्यागत केंद्राचे प्रचलन जपानमध्ये वाकायामा प्रांतिक शासन करत आहे. जपानमधील वाकायामा, कोयासान व टोकियो येथे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. कोयासान या बुद्धिस्ट स्थळाच्या ठिकाणी वाकायामा प्रांतिक शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनास जागा उपलब्ध करून दिली असून, तेथे महाराष्ट्र शासनातर्फे मे २०१५ पर्यंत पुतळा स्थापित केला जाईल, असे यावेळी सांगण्यात
आले.
औरंगाबाद येथे सुरू करण्यात आलेल्या जपानच्या कार्यालयात वाकायामा शासनाचे नोबुओ मियामोटो या जपानी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. एमटीडीसीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी, कार्यकारी अभियंता शैलेंद्र बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रात २० ठिकाणी गरम पाण्याचे झरे व तीर्थस्थळ आहेत, तसेच मासे बाजार भरणारी मोठी ठिकाणे आहेत, अशा स्थळांना जपानने महत्त्व दिले असून, गरम पाण्याचे झरे व मासे बाजार विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला वाकायामा प्रांतिक शासन आर्थिक मदत करण्यास इच्छुक असल्याचे कार्यकारी संचालक हिरोयुकी त्स्युई यांनी यावेळी सांगितले.
फर्दापूर-अजिंठा परिसरात ग्रीन एनर्जीचा वापर करून उच्च क्षमतेच्या अपारंपरिक ऊर्जा साधनांवर आधारित प्रणाली स्थापित करण्याची चाचपणी सुरू आहे.
अजिंठा पर्यटन केंद्राजवळील जागेवर पर्यटनाच्या इतर सोयी- सुविधा पुरविण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जपानच्या जायकातर्फे (जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी) कामे हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.

Web Title: Japan's International Tourism Office will continue in Aurangabad