१०० कोटींचा जॅकवेल, पण गाळ काढायला जागाच नाही! मजीप्राचा छ. संभाजीनगरात 'जादूचा प्रयोग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:16 IST2026-04-20T16:16:40+5:302026-04-20T16:16:57+5:30
२७४० कोटींच्या योजनेत मोठी तांत्रिक चूक; जायकवाडीतील जॅकवेल गाळाने भरल्यास शहराचा पाणीपुरवठा दोन महिने ठप्प होणार?

१०० कोटींचा जॅकवेल, पण गाळ काढायला जागाच नाही! मजीप्राचा छ. संभाजीनगरात 'जादूचा प्रयोग'
मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण होत आल्याचा दावा करण्यात येतोय. योजनेवर पाण्यासारखा पैसा खर्च करून अनेक लहान-मोठ्या त्रुटी राहत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. जायकवाडी धरणात उभारलेल्या महाकाय जॅकवेल (पाणी उपसा विहीर)मध्ये गाळ काढण्याची कोणतीच यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, जॅकवेलची आणि नवीन जलवाहिनीची चाचणीही यशस्वीरीत्या झाली.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३८ किमी आहे. एवढ्या अंतरात पैठण रोडच्या बाजूला २५०० मिमी व्यासाची भव्य जलवाहिनी टाकावी, असे आदेश नॅशनल हायवेने दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तब्बल १८ किलोमीटर रस्त्याच्या खाली जलवाहिनी टाकल्याचा प्रकार तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. जलवाहिनी फुटली तर चारचाकी वाहन किमान १५० फूट उंच उडेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. जलवाहिनी शिफ्ट करणे अशक्य आहे, मग रस्त्यात जेवढी जलवाहिनी येते तेवढा रस्ता लोखंडी बॅरिकेट लावून कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मजीप्राने १६ कोटी रुपये नॅशनल हायवेला दिले. आजपर्यंत लाेखंडी बॅरिकेट बसले नाहीत. अशा धोकादायक अवस्थेत जलवाहिनीची चाचणीही घेण्यात आली.
नवीन पाणीपुरवठा योजनेतील दुसरी गंभीर चूक म्हणजे धरणात २९५ फूट लांब आणि ६५ फूट रुंद असा जॅकवेल उभारला. याचे अंदाजपत्रक २६ कोटींचे होते. प्रत्यक्षात उभारणीसाठी १०० कोटींचा खर्च आला. येथे मजीप्राचा अंदाज चुकला. जॅकवेलची चाचणी गत महिन्यात झाली. सायफन पद्धतीने पाणी घेण्यात येत असून, पाण्यासोबत माती, गाळही येत आहे. जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञ पीएमसी आणि योजनेवर काम करणाऱ्या कंपनीने कोणतीच यंत्रणा उभारलेली नाही. पुढील काही महिन्यांत जॅकवेल गाळाने भरला तर तो रिकामा करण्यासाठी किमान दोन महिने लागू शकतात. एवढ्या मोठ्या योजनेचे काम करताना सर्वाधिक निष्काळजीपणा कसा होवू शकतो, असा प्रश्न या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येतोय.
एका बाजूला गाळ काढण्याची सोय ठेवू
जॅकवेलमध्ये सध्या गाळ काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभारली नसली तरी भविष्यात गाळ एका बाजूला आल्यावर तो काढण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गाळ हळूहळू जमा होईल. एकाच वेळी होत नाही. गाळामुळे कोणतीही अडचण येणार नाही.
-मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, मजीप्रा