छ. संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख जंजाळांविरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:12 IST2026-04-21T20:11:54+5:302026-04-21T20:12:07+5:30
शिंदसेनेत काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे.

छ. संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख जंजाळांविरोधात आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : स्वीकृत नगरसेवक पदावरून शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे विनोद बनकर हे नगरसेवक पदाच्या स्पर्धेत होते. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यासह समर्थकांनी सोमवारी क्रांती चौकात जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
शिंदसेनेत काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदेसेनेला एक स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी होती. या पक्षातील अनेक पदाधिकारी शर्यतीत होते. पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुभम काळे यांची शिफारस केल्याने त्यांची नियुक्ती झाली. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे कट्टर समर्थक विनोद बनकर हे या पदासाठी इच्छुक होते. आपल्याला डावलल्याचे कळताच बनकर आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले. सोमवारी सायंकाळी क्रांती चौकात जमा होऊन बनकर आणि त्यांच्या समर्थकांनी जंजाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. शिवसेना झिंदाबाद, पालकमंत्री संजय शिरसाट तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राजेंद्र जंजाळ मुर्दाबाद, अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणला.
शीतयुद्ध सुरूच
मनपा निवडणुकीत युती करण्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट विरोधात राजेंद्र जंजाळ असे चित्र होते. तेव्हापासून उभय नेत्यांतील शीतयुद्ध काही थांबले नसल्याचे गत बुधवारी झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत दिसून आले होते.
वरिष्ठांच्या आदेशाने निवड
निर्णय प्रक्रिया माझ्या एकट्याच्या हातात नाही. वरिष्ठांच्या आदेशाने शुभम काळे यांची नगरसेवकपदी नेमणूक करण्यात आली. ज्या प्रभागातून विनोद बनकर येतात, त्या प्रभागात चार नगरसेवक आहेत. काळे यांच्या प्रभागात पक्षाचा एकही नगरसेवक नाही. तेथे पक्षाची ताकद यामुळे वाढणार आहे. आमच्या पक्षात जातीयवादाला थारा नाही.
- राजेंद्र जंजाळ, उपमहापौर तथा जिल्हाप्रमुख