डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:55 IST2025-10-09T16:52:48+5:302025-10-09T16:55:01+5:30
जागतिक टपाल दिन : एकेकाळी प्रेमपत्रांपासून नोकरीच्या अर्जांपर्यंत सगळे काही येथून जायचे

डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत
छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी प्रेमपत्रांपासून नोकरीच्या अर्जांपर्यंत सगळे काही या लाल रंगाच्या पत्रपेटीतून प्रवास करत असे; पण डिजिटल युगात या पत्रपेट्या फक्त आठवणीत राहिल्यासारख्या झाल्या आहेत. शहरातील अनेक ठिकाणी टपाल विभागाच्या या पत्रपेट्या धूळखात उभ्या आहेत. काही गंजलेल्या, काही तुटलेल्या, तर काहींचे दरवाजेही हरवलेले आहेत.
जागतिक टपाल दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात फेरफटका मारला असता, सिडको, क्रांती चौक आणि स्टेशन रोड परिसरात अशा जीर्ण झालेल्या पत्रपेट्या दिसल्या. काहींमध्ये कचरा टाकला जातो. तर काहींच्या तळाशी तडे पडले आहेत. एकेकाळी रोज पोस्टमन येऊन पत्रे गोळा करत असत. एका मोठ्या ऐतिहासिक काळाच्या साक्षीदार राहिलेल्या या पत्रपेट्यांशी अनेकांच्या जिव्हाळ्याच्या आठवणी जोडलेल्या आहेत.
जतन करायला हवे
टपाल विभागानुसार, ई-मेल, मोबाइल आणि कुरिअर सेवांमुळे पारंपरिक पत्रव्यवहारात मोठी घट झाली आहे. तरीही ग्रामीण भागात आणि शासकीय पत्रव्यवहारात टपाल सेवेचे महत्त्व आजही टिकून आहे. ज्येष्ठ म्हणतात, ही पत्रपेटी त्याकाळी संवादाचे एक माध्यम होती. सरकारने त्यांचे जतन केले पाहिजे.