अजिंठा लेणीचा रस्ता, पर्यटकांसाठी शिक्षा; सहा वर्षांपासून २० टक्के काम अर्धवट, रोडमॅप अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 19:22 IST2026-04-28T19:19:23+5:302026-04-28T19:22:32+5:30
जागतिक वारसास्थळाची जागतिक बदनामी! अजिंठा लेणीकडे जाताना पर्यटकांचे हाल; सा.बां. विभागाच्या संथ कारभाराचा पर्यटकांना फटका.

अजिंठा लेणीचा रस्ता, पर्यटकांसाठी शिक्षा; सहा वर्षांपासून २० टक्के काम अर्धवट, रोडमॅप अपूर्णच
-विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होण्याचा प्रसंग ओढवत आहे. पाच ठिकाणी रखडलेल्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडमॅप मध्यंतरी तयार केला. मात्र, ते काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहनाने लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांना तो रस्ता शिक्षा देणारा ठरतो आहे.
अजिंठा लेणी या जागतिक वारसा पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यटकांचे होणारे हाल, वाहतुकीची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने वारंवार वृत्तमालिकेतून मांडल्यानंतर सा.बां. विभागाने रस्त्याचे काम हाती घेतले. मात्र, ते काम अद्याप पूर्ण केले नाही.
शहरातील सिडको बसस्थानकापासून ते अजिंठा लेण्यांपर्यंतच्या सुमारे ९५ किमी अंतराच्या रस्त्यापैकी २० किमीमधील काम अजूनही अर्धवट आहे. या रस्त्याची २०१५ ते २०२० या पाच वर्षांत दोन वेळा डागडुजी करण्यात आली. २०२० पासून १ हजार कोटीतून सिमेंट काँक्रिटीकरणातून रस्त्याचे काम सुरू केले. सध्या २०२६ साल सुरू असून अजूनही रस्त्याचे काम झाले नाही.
सिल्लोड शहरातील ६.२ किमी, निल्लोड ७ किमी, हर्सूल १ किमी, पालोद, अजिंठा पुलाचे काम बाकी आहे. यातील निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे काम धुळे सा.बां. विभागाकडे आहे. ७ किमीचे ते काम अपूर्ण आहे.
शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे काय करणार?
अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सूल ते फर्दापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफच्या चौपदरीकरणादरम्यान हर्सूल गावातील मालमत्तांची पाडापाडी करून रस्ता मोकळा केला; परंतु रस्त्यालगत असलेल्या कब्रस्तानाच्या स्थलांतराचा प्रश्न कायम आहे. रस्त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे जागा मागितली होती; परंतु त्यांनी जागा दिली नाही. मग कब्रस्तानच्या जागेचा पर्याय समोर आला. जागा मिळेपर्यंत १० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम तसेच राहिले.
सहा वर्षांत ७५ किमी काम...
रोज ३ किमी काँक्रीट रस्ते बांधण्याचा दावा करणारी यंत्रणा मागील ५ वर्षांपासून ९५ किमीपैकी जेमतेम ७५ किमी रस्ता बांधू शकली आहे. कंत्राटदाराची क्षमता १२० टीपीएच, ३० हजार क्युबिक मीटर दरमहा काँक्रिटीकरणाची असताना देखील कामाला विलंब झाला.
भूसंपादनासाठी प्रस्ताव आला नाही...
हर्सूल परिसरातील रुंदीकरणासाठी किती जागेची आवश्यकता आहे, त्यासाठी बांधकाम विभागाकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे तेथील भूसंपादन तसेच राहिले आहे. त्यामुळे तेथील रस्ता चौपदरी होऊ शकला नाही.
-व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी