शेतकऱ्यांना पेरते व्हा असा दिलासा द्या

By Admin | Updated: April 18, 2016 00:41 IST2016-04-18T00:30:14+5:302016-04-18T00:41:41+5:30

नांदेड : पीककर्ज, बियाणे, खते, विमा, चारा, कृषीपंप जोडणी यासाठी काटेकोर नियोजन करा़

Give relief to the farmers | शेतकऱ्यांना पेरते व्हा असा दिलासा द्या

शेतकऱ्यांना पेरते व्हा असा दिलासा द्या

नांदेड : पीककर्ज, बियाणे, खते, विमा, चारा, कृषीपंप जोडणी यासाठी काटेकोर नियोजन करा़ यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पेरते व्हा असा दिलासा द्या, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले़
जिल्ह्यातील खरीप हंगाम-२०१६ च्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत रावते बोलत होते़ बैठकीला जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, आ़ अमर राजूरकर, आ़ डी़ पी़ सावंत, आ़ सुभाष साबणे, आ़ नागेश पाटील आष्टीकर, आ़ अमिता चव्हाण, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आयुक्त सुशील खोडवेकर यांची उपस्थिती होती़ रावते म्हणाले, मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत मिळाली पाहिजे यासाठी नियोजन करा़ पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज, त्याच्या कर्जाचे वेळेत पुनर्गठन होईल याकडे लक्ष द्या़ आगामी हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करा़ त्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहू नका़ बँकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत़ कर्ज पुरवठ्याबाबत प्रक्रिया कागदपत्रांची माहिती देण्यासाठी मंडळनिहाय नियोजन करा़ प्रत्येक बँकेने कर्ज वाटपासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा़ कोरडवाहू शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा़ उसासाठी शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर करावा़ आंतरपीक पद्धतीने चांगले उत्पन्न देणाऱ्या तूर, मूग अशा तृणधान्यांची पिके घेण्यासाठी शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना विविध माध्यमातून माहिती द्या़ कर्ज वाटप, पीक पद्धतीतील बदल यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा़ आगामी काळात शेतकऱ्यांची बी-बियाणांच्या बाबतीत फसवणूक होणार नाही़ त्यामध्ये गैरप्रकार होणार नाहीत़ यासाठी कृषी विभागाने सतर्क रहावे़ खतांचा काळा बाजार होवू नये यासाठी वारंवार नोंदी घ्याव्या़
मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या व तयार केलेली खात्रीलायक बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, असे नियोजन करा अशाही सूचना रावते यांनी दिल्या़

Web Title: Give relief to the farmers