‘पेट’च्या पहिल्या पेपरला आप्तस्वकीयांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:58+5:302021-02-05T04:11:58+5:30

औरंगाबाद : विद्यापीठाने शनिवारी घेतलल्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या (पेट) पहिल्या पेपरच्या वेळी पारदर्शकतेचा मोठा अभाव दिसून आला. ऑनलाईन झालेल्या ...

The first paper of 'Pet' was contributed by Aptasvakis | ‘पेट’च्या पहिल्या पेपरला आप्तस्वकीयांचा हातभार

‘पेट’च्या पहिल्या पेपरला आप्तस्वकीयांचा हातभार

औरंगाबाद : विद्यापीठाने शनिवारी घेतलल्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या (पेट) पहिल्या पेपरच्या वेळी पारदर्शकतेचा मोठा अभाव दिसून आला. ऑनलाईन झालेल्या या परीक्षेत परीक्षार्थींना कुठे नातेवाईकांनी, तर कुठे मित्रांनी उत्तरे शोधून सांगितली. त्यामुळे पहिल्या पेपरचा निकाल बऱ्यापैकी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्या वतीने शनिवारी ४२ विषयांसाठी सकाळी १० ते १ वाजेदरम्यान ‘पेट‘चा पहिला पेपर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. या पेपरसाठी ११ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ६१४ विद्यार्थ्यांनी या पेपरकडे पाठ फिरवली.

विद्यार्थ्यांनी घरीच बसून कोणी मोबाइलवर, कोणी लॅपटॉप, तर कोणी कॉम्प्युटरवर ही परीक्षा दिली. परीक्षेत बुद्धिमत्ता कौश्यलावर आधारित प्रश्न होते. ‘यूपीएससी’च्या धर्तीवर विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेकांची भंबेरी उडाली. तेव्हा नातेवाईक, मित्रांपैकी कोणी ‘गुगल’वर, तर कोणी पुस्तकांमधून उत्तरे शोधून ती परीक्षार्थींना सांगितली. अर्थात या ऑनलाइन परीक्षेत कॉपी करण्यास मोठा वाव मिळाल्याचे पाहून अनेक परीक्षार्थींचे चेहरे उजळलेले दिसले.

काही ठिकाणी मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. प्रामुख्याने ग्रामीण भागात मोबाइलची इंटरनेट सेवा हँग झाल्यामुळे बहुतांशी विद्यार्थांना अर्ध्याच्यावर प्रश्न ओपन झालेच नाहीत. एकतर गेल्या चार वर्षांपासून रखडलेली ‘पेट’ आता कुठे झाली आणि त्यात इंटरनेटचा व्यत्यय आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश झाला. या परीक्षेचा निकाल सोमवार, दि. १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. ‘पेट’चा दुसरा पेपर २१ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्या पेपरचा निकाल २४ फेब्रुवारी रोजी लागेल.

चौकट.....

‘पेट‘चा दुसरा टप्पा १ मार्चपासून

‘पेट‘चा दुसरा टप्पा १ मार्चपासून राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सूट मिळालेले नोंदणी करण्यासाठी पात्र असतील. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी’मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १ ते १५ मार्च दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल, तर २० मार्चपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल.

Web Title: The first paper of 'Pet' was contributed by Aptasvakis