सोनोग्राफी मशीनने घरातच गर्भलिंग निदान; तिसरी मुलगी नको म्हणून लगेच गर्भपातही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 06:36 IST2026-03-13T06:36:32+5:302026-03-13T06:36:44+5:30
विवाहिता नारेगावमध्ये वास्तव्यास आहे. पहिली मुलगी झाल्याने तिला माहेरी पाठण्यात आले होते.

सोनोग्राफी मशीनने घरातच गर्भलिंग निदान; तिसरी मुलगी नको म्हणून लगेच गर्भपातही
छत्रपती संभाजीनगर : दोन मुलींपाठोपाठ तिसरी मुलगी नको म्हणून कुटुंबाने गर्भपात करणाऱ्या टोळीकडून घरातच विवाहितेच्या गर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू-सासरे, गर्भपात टोळीतील कमल तिनगोसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता नारेगावमध्ये वास्तव्यास आहे. पहिली मुलगी झाल्याने तिला माहेरी पाठण्यात आले होते.
दुसऱ्यांदाही मुलगी झाल्याने पती तिला रुग्णालयातच सोडून गेला होता. मात्र, नातेवाइकांच्या मध्यस्थीने विवाहिता पुन्हा पतीकडे नांदण्यास गेली होती. मुलाच्या हट्टापायी विवाहिता तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. पाच महिन्यांची गर्भवती असताना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या पतीने दोन पुरुष व एक महिलेला घरी आणले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन होते. यावेळी महिलेने गर्भलिंगनिदान करण्यास तीव्र विरोध केला. मात्र, तिला मारहाण करून चाचणी करण्यात आली.
टाेळीचे निर्घृण कृत्य
सायंकाळी ५:३० वाजता विवाहितेला उलटे झोपवून महिलेने दाब देण्यास सुरुवात केली. टोळीने तिची शस्त्रक्रिया करून गर्भ काढण्याची तयारी सुरू केली. विवाहितेच्या वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी तिच्या घरी धाव घेतली. तोपर्यंत विवाहितेची प्रकृती बिघडली होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत तिच्या कुटुंबासह गर्भपात करणारी टोळी पसार झाली. याप्रकरणात पुन्हा जालन्याच्याच गर्भपात करणाऱ्या टोळीचा सहभाग असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, ते सर्व मोबाइल बंद करून पसार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.