वडिलांच्या कष्टाचं तिनं मोल केलं...

By Admin | Updated: June 18, 2014 01:41 IST2014-06-18T00:59:37+5:302014-06-18T01:41:35+5:30

हणमंत गायकवाड , लातूर तीन- चार एकर कोरडवाहू जमीन... निसर्गाने दिली साथ तर कधी पिकायचं... नाही तर पेरलेलं खर्चही वाया जायचा...

The father's hard work earned him ... | वडिलांच्या कष्टाचं तिनं मोल केलं...

वडिलांच्या कष्टाचं तिनं मोल केलं...

हणमंत गायकवाड , लातूर
तीन- चार एकर कोरडवाहू जमीन... निसर्गाने दिली साथ तर कधी पिकायचं... नाही तर पेरलेलं खर्चही वाया जायचा... पोहरेगावच्या लक्ष्मण खाडप यांची ही स्थिती... अशा बिकट स्थितीत त्यांच्या पदरी तीन कन्या जन्माला आल्या. उपजतच प्रचंड बुद्धीमत्ता घेऊन जन्मलेल्या या बाळांना कसल्याही परिस्थितीत शिकवायचं, असा ध्यास खाडपांचा आणि त्यांनी थेट पोहरेगावच्या जि.प. शाळेतून मुलींना श्री केशवराज विद्यालयात घातलं. पहिल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८५ तर आता दुसऱ्या मुलीने आता ९६.२० टक्के गुण घेऊन लक्ष्मणरावांच्या बाहुत बळ दिलं आहे.
रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील लक्ष्मण खाडप यांना तीन-चार एकर कोरडवाहू जमीन आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या या जमिनीच्या पिकावर अवलंबून न राहता त्यांनी गावातच ‘लोकमत’चे वार्ताहर म्हणूनही काही वर्ष काम केले. या वृत्तपत्रात काम केल्यामुळे शिक्षणाचे महत्व कळाले असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांनी पोहरेगाव सोडलं आणि थेट लातूर गाठलं. लातुरातील श्री केशवराज विद्यालयात दोन्हीही मुलींना शिक्षण दिलं. दोन नंबरच्या अंकिताचा दहावीचा निकाल मंगळवारी लागला. त्यात अंकिताला ९६.२० टक्के गुण मिळताच लक्ष्मणराव पुटपुटले, माझ्या कष्टाचं मोल झालं. पहिली मुलगी विज्ञान शाखेत आहे. अंकिताही विज्ञानलाच प्रवेश घेणार आहे.
अंकिताला व्हायचंय् डॉक्टर...
वडील आमच्यासाठी काबाड कष्ट करतात. मी पाचवीपर्यंत पोहरेगावच्या जिल्हा परिषद शाळेत होते. वडिलांनी शहरातील शाळेत घातलं. तिथे काहीच कमी पडू दिले नाही. त्यांचे कष्ट आम्ही पाहतो आहोत. हे कष्ट वाया जाऊ देणार नाही. मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होणार आहे. दहावीला मला विज्ञान विषयात ९८ तर संस्कृतमध्ये १०० पैकी १०० मार्क्स मिळाले आहेत. मार्क्स घटू न देणे आणि डॉक्टर होणे हे आपले पुढील ध्येय असेल, असेही अंकिता खाडप म्हणाली.

Web Title: The father's hard work earned him ...