आता ५ ट्रॅकवर होणार ड्रायव्हिंग टेस्ट; कार परफेक्ट शिका, नाहीतर 'पर्मनंट लायसन्स' विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:49 IST2026-04-27T15:48:14+5:302026-04-27T15:49:44+5:30

करोडीत होणार अत्याधुनिक 'एडीटीटी' ट्रॅक; सेन्सरच्या मदतीने होणार मूल्यमापन, मानवी हस्तक्षेप संपणार.

Driving License to get Tougher in Chhatrapati Sambhajinagar; New 5-Track Sensor System at Karodi RTO | आता ५ ट्रॅकवर होणार ड्रायव्हिंग टेस्ट; कार परफेक्ट शिका, नाहीतर 'पर्मनंट लायसन्स' विसरा

आता ५ ट्रॅकवर होणार ड्रायव्हिंग टेस्ट; कार परफेक्ट शिका, नाहीतर 'पर्मनंट लायसन्स' विसरा

- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर :
आरटीओ कार्यालयात गेले आणि एक राउंड मारून पर्मनंट लायसन्स मिळवले, असे आता चालणार नाही. चारचाकी चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता अधिक कठीण होणार आहे. चारचाकीच्या लायसन्ससाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच वेगवेगळ्या ट्रॅकवर कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे ‘जेमतेम ड्रायव्हिंग’ चालणार नाही, तर परफेक्ट ड्रायव्हिंगच आवश्यक राहणार आहे.

आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) होणार आहे. त्यासंदर्भातील आराखडा समोर आला आहे. आरटीओ कार्यालयाकडून सध्या करोडी येथील जागेत पर्मनंट लायसन्ससाठी चाचणी घेतली जाते. मात्र, या ठिकाणी सध्या कोणताही टेस्टिंग ट्रॅक नाही. मातीच्या ट्रॅकवरच दुचाकी, चारचाकी चालवून दाखवावी लागते. मात्र, लवकरच या ठिकाणी अत्याधुनिक असा टेस्टिंग ट्रॅक होणार आहे.

नव्या ट्रॅकवर चारचाकीची कशी होईल टेस्ट?
चारचाकी वाहनचालकांसाठी इंग्रजी अंकातील ‘8’ हा ट्रॅक, ‘एच’ ट्रॅक, समांतर पार्किंग ट्रॅक, दोन्ही बाजूंनी वळण घ्यावा लागणारा ट्रॅक आणि चढावर वाहन थांबवून पुन्हा पुढे जाण्याची चाचणी घेणारा ट्रॅक असेल. यातूनच चालकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांची चाचणी घेतली जाईल.

दुचाकीचालकांसाठी वेगळा ट्रॅक
दुचाकीचालकांसाठी इंग्रजी अंकातील ‘8’ ला ‘0’ जोडून असलेला ट्रॅक असेल. म्हणजे चालकाला इंग्रजी अंकातील ‘8’ ला वळण घेत पुढे ‘0’लाही वळण घ्यावे लागेल.

सेन्सरची मदत
यंत्रावर आधारित, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय उमेदवाराच्या वाहन चालन कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. चाचणी पूर्ण होताच त्वरित आणि अचूक अहवाल तयार होईल. उमेदवार चाचणीत पास झाला की अनुत्तीर्ण झाला, याची माहिती तत्काळ मिळेल. एकाच वेळी अनेक उमेदवारांची चाचणी घेऊन जलद सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून वेटिंग कमी होण्यास मदत होईल.

‘सीआयआरटी’कडून पाहणी
ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅकची (एडीटीटी) डिझाइन आणि जागा निश्चित झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडून (सीआयआरटी) करोडी येथील जागेची पाहणी करण्यात आली. लवकरच ट्रॅकचे काम सुरू होईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title : ड्राइविंग टेस्ट हुई सख्त: पांच ट्रैक पास करो, वरना लाइसेंस रद्द!

Web Summary : स्थायी ड्राइविंग लाइसेंस पाना मुश्किल होगा। पांच ट्रैक पर कौशल का परीक्षण होगा। आरटीओ में एडवांस्ड ड्राइविंग टेस्टिंग ट्रैक आ रहा है। सेंसर-आधारित मूल्यांकन और त्वरित परिणाम मिलेंगे, जिससे केवल कुशल ड्राइवर ही पास होंगे।

Web Title : Tougher Driving Tests Coming: Five Tracks or License Denied!

Web Summary : Permanent driving licenses will be harder to get. Five tracks test skills. Advanced Driving Testing Track coming to RTO. Expect sensor-based evaluations and instant results, ensuring only skilled drivers pass.