...तर विकासासाठी गावे खाजगी कंपन्यांकडे

By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-28T00:04:17+5:302014-07-28T00:56:58+5:30

उस्मानाबाद : केंद्र शासन दरवर्षी १७५ हजार कोटी रुपयांचा निधी विविध योजनांसाठी खर्च करीत आहे. मात्र त्यानंतरही ग्रामीण भागा विकासापासून वंचित आहे.

... but for the development of the villages, the private companies | ...तर विकासासाठी गावे खाजगी कंपन्यांकडे

...तर विकासासाठी गावे खाजगी कंपन्यांकडे

उस्मानाबाद : केंद्र शासन दरवर्षी १७५ हजार कोटी रुपयांचा निधी विविध योजनांसाठी खर्च करीत आहे. मात्र त्यानंतरही ग्रामीण भागा विकासापासून वंचित आहे. गावात पैसा आली की विकासकामासाठी त्याचे नियोजन करण्याऐवजी आपापसातील मतभेदाला सुरुवात होते. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. अन्यथा येणाऱ्या काळात विकासासाठी गावेच्या गावे खाजगी कंपन्यांकडे वर्ग करावी लागतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी दिला.
परंडा येथील कन्या प्रशालेमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंचन आयोगाचे अध्यक्ष दि.मा. मोरे, जलतज्ज्ञ अनिल पाटील, गोदावरी विकास खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ग यापूर्वी रोजगारासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे शहराकडे स्थलांतर होत होते. मात्र आता पाण्यासाठी स्थलांतर सुरु झाल्याचे सांगत, शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनीही पाणी वापर तसेच पाणी जिरवण्याबाबत शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ज्या जिल्ह्यात हजारो टन ऊस गाळपासाठी उभा आहे. त्याच जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी टँकर सुरु असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यात ५० हजार टन ऊस गाळपासाठी उभा असताना अनेक गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगत, यासंदर्भातील विरोधाभास त्यांनी उघड केला. इंग्रजांनी ग्रामव्यवस्था मोडीत काढल्याने देशाचे मोठे नुकसान झाल्याचे मोरे यावेळी म्हणाले. दरम्यान, प्रारंभी माजी आमदार वासुदेवराव देशमुख यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी तात्यासाहेब गोरे, बाबासाहेब खरसडे, साहित्यिक तु.दा. गंगावणे, माजी नगराध्यक्ष अकील जिनेरी, भारत घोगरे, मुख्याध्यापक डी.डी. शेरे, प्राचार्य गोविंद जाधव, पोपट गटकूळ, किरण शहा आदींनी पुढाकार घेतला. शेवटी राखी देशमुख यांनी आभार मानले.
पाणी धोरण व्यापारी मानसिकतेतून
पाण्याचा विषय अतिशय गंभीर असून, तो सर्वांनी समजून घ्यायला हवा. शासनानेही पाणी धोरण समाजाचे, देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून आखण्याची गरज आहे. सध्याचे धोरण व्यापारी मानसिकता समोर ठेवून आखले जात असल्याची टीकाही पोपटराव पवार यांनी केली. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्यामुळेच शेतीसह सर्वच अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत ही परिस्थिती का ओढवली याचा प्रत्येकाने अभ्यास करण्याची गरज आहे.पाण्याचे महत्व वेळीच समजून घेतले तर त्या अनुषंगाने उपाययोजना करणे सुलभ होईल. अन्यथा हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.
प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवा
प्रत्येकाला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. या थेंबावरुनच कदाचित पुढची क्रांती होईल, असा इशाराही सिंचन आयोगाचे अध्यक्ष दि. मा. मोरे यांनी दिला. शेतीला पाटातून, जमिनीवरुन पाणी देण्याची पद्धत आता बदलावी लागेल. त्याऐवजी थेट मुळावर पाणी कसे देता येईल हे पहावे लागेल. पाणी व्यवस्थापनाबरोबरच पीक व्यवस्थापनाचीही गरज असल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्याने चळवळ उभारावी
नद्याजोड प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी मराठवाड्यात चळवळ उभारण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी सांगितले. वाहून जाणारे पाणी गगनबावड्या जवळून भीमा नदीत आणि तेथून ते उजनी प्रकल्पात आणण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास मराठवाड्याला हक्काचे २५ टीएमसी पाणी मिळेल, असे पाटील यावेळी म्हणाले.
विचाराच्या राजकारणाची गरज
अनेक चांगली माणसे राजकारणात असली तरी अलीकडील काळात राजकारणाचा दर्जा घसरत असल्याबाबत रा.प. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी चिंता व्यक्त केली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगली, उच्च शिक्षित माणसे राजकारणात आली पाहिजेत, कोणतीही व्यक्ती जातीच्या आधारे नव्हे तर त्याच्या विचारातून मोठी होत असते. वासुदेवराव देशमुख यांनी असेच विचाराचे राजकारण केले. त्यामुळेच सर्वांनी त्यांना स्वीकारले. विचाराच्या राजकारणाची ही परंपरा पुढे घेऊन जाण्याची गरजही गोरे यांनी व्यक्त केली.

Web Title: ... but for the development of the villages, the private companies