विकास आराखड्याचे पाकीट सोमवारी फुटणार

By Admin | Updated: December 23, 2015 00:07 IST2015-12-22T23:37:37+5:302015-12-23T00:07:26+5:30

औरंगाबाद : शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

The development plan wraps on Monday | विकास आराखड्याचे पाकीट सोमवारी फुटणार

विकास आराखड्याचे पाकीट सोमवारी फुटणार

औरंगाबाद : शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यासाठी विशेष सर्वसाधारण बोलावली असून, त्यात सभेसमोर हा आराखडा ठेवला जाणार आहे. नगररचना खात्याने दीड महिन्यापूर्वी हा आराखडा बंद पाकिटात आयुक्तांकडे सादर केलेला आहे.
महानगरपालिकेच्या मूळ विकास आराखड्यात १९९१ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर मनपाने २०१२ साली या आराखड्यात सुधारणा करण्याचे काम नगररचना खात्याकडे सोपविले. तब्बल वर्षानंतर नगररचना खात्याने ३० आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्याकडे हा सुधारित आराखडा सादर केला होता. हा आराखडा सर्वसाधारण सभेसमोर ठेवून नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेऊन तो अंतिम केला जाईल; परंतु गेल्या दीड महिन्यापासून हा आराखडा आयुक्तांकडे बंद पाकिटात पडलेला आहे.
आता अखेर महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यासाठी सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी विशेष सभा बोलावली आहे. या सभेत हा आराखडा जाहीर केला जाईल. सुधारित आराखड्यात शहरालगतच्या नो डेव्हलपमेंट झोनमधील बरीचशी जमीन यलो झोनमध्ये येण्याची शक्यता
आहे.
त्या हरकती आणि सूचनांवर मनपाच्या समितीकडून सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर मनपाकडून आवश्यक ते बदल करून तो आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगररचना खात्याच्या नियमांनुसार महानगरपालिकेकडून सर्वसाधारण सभेनंतर हा सुधारित विकास आराखडा जाहीर केला जाईल. त्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात येतील, अशा सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी असेल.

Web Title: The development plan wraps on Monday