डाळींच्या भावात अखेर घट

By Admin | Updated: July 22, 2016 00:44 IST2016-07-22T00:03:21+5:302016-07-22T00:44:09+5:30

औरंगाबाद : समाधानकारक पाऊस व पोषक वातावरणामुळे पीक चांगले येणार, असे आशादायक वातावरण तयार झाले आहे.

Decrease in pulses prices | डाळींच्या भावात अखेर घट

डाळींच्या भावात अखेर घट

औरंगाबाद : हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक महागाईत पार होरपळून निघाला होता. मात्र, समाधानकारक पाऊस व पोषक वातावरणामुळे पीक चांगले येणार, असे आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यात नवीन मुगाची आवक १५ आॅगस्टनंतर सुरू होणार असल्याने साठेबाजांनी आपल्याकडील साठा विक्रीला काढला असल्याने होलसेल विक्रीत सर्व डाळींच्या भावात घट झाली आहे.
डाळींचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे. मुळात मोठ्या साठेबाजांवर कारवाई करण्याऐवजी होलसेल, किराणा विक्रेत्यांना लक्ष्य केले जात आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
मूग, उडीद, तुरीसाठी हे वातावरण पोषक आहे. यंदा उत्पादन चांगले होणार असल्यामुळे साठेबाजांच्या मनोवृत्तीत बदल झाला आहे. नवीन मूग, उडीद बाजारात येण्याआधीच जुनी विक्री करण्यासाठी साठेबाज सक्रिय झाले आहेत. परिणामी आठवडाभरात डाळींच्या भावात क्विंटलमागे ५०० ते १००० रुपयांपर्यंत घट झाली आहे. कर्नाटकातील नवीन मूग १५ आॅगस्टपर्यंत बाजारात येणार आहे. त्यानंतर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील नवीन मूग बाजारात येईल.
परिणामी क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाव कमी होऊन ८००० ते ८५०० रुपये प्रतिक्विंटलने गुरुवारी मूग डाळ विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात उडदाचे भाव कमी झाले, नोव्हेंबरमध्ये नवीन उडदाची आवक सुरू होईल. परिणामी १ हजार रुपयांनी भाव कमी होऊन उडीद डाळ १४००० ते १५००० रुपये विक्री होत आहे. तुरीची लागवडही मागील तीन वर्षांच्या तुलनेत दीडपट अधिक झाल्याचे कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी सांगितले. तूर डाळीतही ५०० रुपये कमी झाले असून, १२५०० ते १३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. यंदा हरभरा डाळीच्या भावाने शंभरी ओलांडली. ५०० रुपये कमी होऊन गुरुवारी १०,००० ते ११,००० रुपये प्रतिक्विंटल हरभरा डाळ विकल्या गेली.

Web Title: Decrease in pulses prices