मतदार नोंदणीला सर्वत्र थंड प्रतिसाद
By Admin | Updated: July 28, 2014 01:05 IST2014-07-28T00:38:26+5:302014-07-28T01:05:26+5:30
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने रविवारी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविली.
मतदार नोंदणीला सर्वत्र थंड प्रतिसाद
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने रविवारी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविली. मात्र, पुरेशा प्रसिद्धीअभावी शहरात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. नोंदणी मोहिमेची माहितीच नसल्यामुळे अनेक केंद्रांवर दिवसभर शुकशुकाट होता.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे राज्यात मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जून महिन्यात काही रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यात यादीत नाव नसलेल्या हजारो मतदारांनी नोंदणी अर्ज भरून दिले. परंतु अजूनही १८ वर्षांवरील असंख्य नागरिक यादीत नावनोंदणी करायचे राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज पुन्हा हीच मोहीम राबविली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दिवसभर हजर राहून नोंदणी अर्ज भरून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या मोहिमेची पुरेशी प्रसिद्धी केली नव्हती. त्यामुळे शहरात थंड प्रतिसाद मिळाला. तुरळक केंद्रांवरच नागरिकांनी येऊन अर्ज भरून दिले. जिल्हा परिषद, देवगिरी हायस्कूल, कडा कार्यालय, खडकेश्वर आदी ठिकाणच्या केंद्रांवर दुपारपर्यंत एखाद-दुसरा अर्ज आला.
केवळ ८८८ अर्ज
शहरातील ८५० मतदान केंद्रांवर दिवसभरात केवळ ८८८ जणांनी नवीन नोंदणीचे अर्ज भरून दिले. मध्य विधानसभा मतदारसंघात २११ जणांचे अर्ज आले. पश्चिम मतदारसंघात २३४ आणि पूर्व मतदारसंघात २११ जणांनी अर्ज भरून दिले.
ग्रामीण भागात २५० जणांची नाव नोंदणी
शहरापेक्षाही ग्रामीण भागात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एकूण १,१५८ जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. या १,१५८ पैकी ८८८ अर्ज शहरातील आहेत. राहिलेले जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत.
दरम्यान, ३ आॅगस्ट रोजीही मतदान केंद्रांवर अशीच नोंदणी मोहीम राबविली जाणार असल्याचे शशिकांत हदगल यांनी सांगितले.
नोंदणी अधिकारी गैरहजर
शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत हजर राहण्याच्या सूचना निवडणूक शाखेने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तरीही काही केंद्रांवर बीएलओ गेलेच नाहीत.
तहसील कार्यालयाने काही केंद्रांची पाहणी केली. त्यानुसार भावसिंगपुरा भागातील दोन मतदान केंद्रांवर बीएलओ गैरहजर असल्याचे आढळून आल्याची माहिती तहसीलदार विजय राऊत यांनी दिली.