छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेलाइन ‘डीपीआर’मध्येच; मंजुरी कधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:04 IST2026-05-11T15:03:04+5:302026-05-11T15:04:03+5:30
रेल्वेने जोडले जाणार शनिशिंगणापूर! छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाचे काम कागदावरच; प्रवाशांची प्रतीक्षा संपणार कधी?

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेलाइन ‘डीपीआर’मध्येच; मंजुरी कधी मिळणार?
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर (नगर) या ८५ किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अद्याप अंतिम टप्प्यातच आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक असलेली मंजुरी अद्याप मिळालेली नाही.
माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मार्गाचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे.प्रकल्पाचे स्वरूप आणि महत्त्वहा रेल्वेमार्ग केवळ 'सिंगल लाईन' नसून विद्युतीकरणासह 'डबल लाईन' स्वरूपात उभारला जाणार आहे. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. औद्योगिक आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग 'लाईफलाईन' ठरू शकतो.
धार्मिक पर्यटनाला मिळणार बळ
या मार्गाच्या डीपीआरनुसार, यामध्ये शनिशिंगणापूर सारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना थेट रेल्वेने प्रवास करता येणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रस्तावित रेल्वे स्थानके
'डीपीआर’नुसार या मार्गावर देवगिरी कॅन्ट, रांजणगाव, येसगाव, गंगापूर, देवगड, नेवासा, उस्थाळ दुमाला, शनिशिंगणापूर, ब्राह्मणी आणि वांभोरी अशी स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. विशेषतः शनि शिंगणापूरसारख्या धार्मिक स्थळाला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, हा प्रकल्प पुढे सरकत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रेल्वेमार्गाला लवकर मंजुरी मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर प्रवास अधिक वेगवान होण्याबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.