छत्रपती संभाजीनगर : घराबाहेर फेरफटका, किराणा खरेदी किंवा एटीएममधील साधे व्यवहारही आता ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. गोड बोलून ओळख असल्याचे सांगणे, मदतीचा बहाणा करणे, खोटे आमिष दाखवून वृद्धांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शहरात २४ तासांत अशाच दोन घटनांमध्ये वृद्ध महिला आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याची लूट झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
८५ वर्षीय कमल पाटील १३ मे रोजी सकाळी ८ वाजता किराणा दुकानात खरेदीसाठी जात होत्या. यावेळी एका अज्ञाताने त्यांना अडवले. तुमच्या मुलाचा मित्र असल्याचे सांगून रस्त्याच्या कडेला नेत गप्पा मारण्यास सुरूवात केली. तुमच्या नावाने पैसे आले असून, मला ते तुम्हाला देण्यास सांगितले आहे, असे म्हणत बळजबरीने त्यांच्या हातावर पैसे टेकवले. अचानक घडत असलेल्या या प्रसंगामुळे पाटील गडबडून गेल्या. त्यातच घाई करत लुटारूने तुमच्या गळ्यातील दागिन्याचे वजन करून पैसे देण्यास सांगितले आहे, असे म्हणत त्याने पाटील यांच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या हिसकावून घेतल्या. काही कळायच्या आत लुटारूने बांगड्या काढून पोबारा केला.
बेजबाबदार नागरिकांचे दुर्लक्ष
वयस्कर कमल पाटील यांनी तत्काळ आसपासच्या नागरिकांना त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. लुटारूचा पाठलाग करण्याची विनंती केली. परंतु एकाही नागरिकाने त्यांचे ऐकले नाही. पाटील कळकळीने मदत मागत असताना नागरिक पाठ फिरवून निघून गेले. पुंडलिकनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
एटीएम सेंटरमध्ये फसवणूक सुरूच
शहरातील एटीएम सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने नागरिकांची लूटमार सुरूच आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण एटीएम सेंटरमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे असताना फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध लावू शकलेले नाही. सेवानिवृत्त हानिफ युसूफ बेग (७३, रा. बीडबायपास) हे दि. १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहानुरमिया दर्गा परिसरातील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. तेव्हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत एकाने त्यांना मदतीचा बहाणा केला. त्यांचा पासवर्ड हेरुन कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर तासाभरात वेगवेगळ्या पंपावर कार्ड स्वाइप करून ८१ हजार ५०० रुपये रोख घेतली.
फसवणूक, लूटमारीचे सत्र सुरूच
चाकू लावून लुटणे, सोनसाखळी हिसकावून नेण्यासोबत आता कुठे गोड बोलून, कुठे दान सुरू असल्याचे कारण करून, तर कुठे मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरूच आहे.
- २१ एप्रिलला ५६ वर्षीय वनमाला गोसावी यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करुन १ लाख ४३ हजार लंपास केले गेले.
- २१ एप्रिल रोजीच दुपारी विजय चव्हाण यांचे कार्ड बदलून ४३ हजार रुपये लुटले.
- २२ एप्रिलला ७० वर्षीय म्हाळसा पगारे यांना दान सुरू असल्याचे सांगून १० भाराचे चांदीचे कडे व रोख लंपास केली.
- १४ एप्रिलला ७० वर्षीय सरुबाई कांबळे यांना ‘तुमच्या मुलाचे पैसे बँकेत आलेत, आमच्यासोबत चला’, असे म्हणून अंगावरील ५ ग्रॅमचे सोने लुटून पसार झाला.
- २७ मार्च रोजी ६५ वर्षीय पद्मा आरगी यांना वस्त्रदान सुरू असल्याचे सांगून गुलमंडीत १ तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली.
- २८ मार्चला सेवानिवृत्त अधिकाऱ्याला हत्या झाल्याचे सांगून अंगावरील दागिने लुटण्यात आले.
Web Summary : Elderly in Chhatrapati Sambhajinagar are targeted with false pretenses. Recent incidents include theft of jewelry and ATM fraud. Citizens urged to be vigilant and report suspicious activity. Police are investigating.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में बुजुर्गों को झूठे बहाने से निशाना बनाया जा रहा है। हाल की घटनाओं में गहनों की चोरी और एटीएम धोखाधड़ी शामिल है। नागरिकों से सतर्क रहने और संदिग्ध गतिविधि की रिपोर्ट करने का आग्रह किया गया है। पुलिस जांच कर रही है।