छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉम. परीक्षेत प्रश्नपत्रिका लीक करून व्हायरल केल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील हतनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरून झाल्याचे तपासणीत उघड झाले. या पेपरची परीक्षा नव्याने होणार असून, परीक्षा केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. तसेच केंद्रातील संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत ११ एप्रिल रोजी बी. कॉम. तृतीय वर्ष सहाव्या सत्राचा ‘डायरेक्ट टॅक्स’ या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाॅट्स्ॲपवर व्हायरल झाली. तसेच १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विद्यार्थांना विक्रीही करण्यात आल्याचा प्रकार शहरातील मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या सेंटरबाहेर संस्थाचालक तथा प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांच्यासह विद्यापीठाच्या पथकाने उघडकीस आणला. याची माहिती विद्यापीठाला कळविताच संचालक डॉ. डोळे यांच्यासह डॉ. दीपक पाचपट्टे आणि डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केंद्राला भेट दिली. त्याठिकाणी परीक्षा सुरळीतपणे सुरू होती. त्याचवेळी कुलगुरूंनी दोघांची चौकशी समिती नेमली.
परीक्षा विभागातील तांत्रिक यंत्रणेच्या साह्याने प्रश्नपत्रिका कोठून फुटली, याचा शोध घेण्यात आला. त्यानुसार कन्नड तालुक्यातील हातनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरून प्रश्नपत्रिका लिक झाल्याचे उघडकीस आले. याच केंद्रावरून १२ वाजून ४७ मिनिटांनी पेपर डाउनलोड होऊन १२ वाजून ५३ मिनिटांनी मोबाइलवर व्हायरल करण्यात आला. समितीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. वाघमारे, केंद्रप्रमुख आर. एस. अकोलकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यानंतर अहवाल सादर केला. त्यावर पुन्हा एक समिती नेमली. या समितीनेही १८ एप्रिल रोजी कारवाईची शिफारस केली. त्यानुसार कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सोमवारी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द, गुन्हे नोंद आणि पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले.
४ मे रोजी होणार परीक्षाप्रश्नपत्रिका व्हायरल झालेल्या ‘डायरेक्ट टॅक्सेस’ पेपरची परीक्षा रद्द केल्यामुळे ही परीक्षा ४ मे रोजी नव्याने घेण्यात येईल. या पेपरला चार जिल्ह्यांत ८ हजार ८४ विद्यार्थी बसले होते. हतनूर परीक्षा केंद्र बदलून कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची परीक्षा २१ एप्रिलपासूनच होणार आहे. तसेच केंद्रावर नियुक्त कोहिनूर महाविद्यालयातील बहिस्थ वरिष्ठ केंद्रप्रमुख प्रा. ए. झेड. शेख हे जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्यामुळे त्यांनाही खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
४८ तासात गुन्हा नोंदवामहाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पेपर डाउनलोड केल्याप्रकरणी संबधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात ४८ तासांच्या आत गुन्हा नोंदवून विद्यापीठास अहवाल सादर करावा. सदरील प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, कारवाईस टाळाटाळ केल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल.-डॉ. विजय फुलारी, कुलगुरू
Web Summary : B.Com 'Direct Tax' paper leaked from Hatnur college. Re-exam on May 4th, center permanently closed. Staff face charges following the university investigation.
Web Summary : बी.कॉम का 'डायरेक्ट टैक्स' पेपर हतनूर कॉलेज से लीक। 4 मई को पुन: परीक्षा, केंद्र स्थायी रूप से बंद। विश्वविद्यालय जांच के बाद कर्मचारियों पर आरोप तय।