पैसे घेतल्याचा आरोप; कन्नडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांत जुंपली

By Admin | Updated: May 29, 2014 01:14 IST2014-05-29T01:08:37+5:302014-05-29T01:14:45+5:30

कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांनी महिला कर्मचार्‍यांकडून सेवासातत्यासाठी पैसे घेतले.

Accused of taking money; Kannada's medical superintendent and doctor jumped | पैसे घेतल्याचा आरोप; कन्नडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांत जुंपली

पैसे घेतल्याचा आरोप; कन्नडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांत जुंपली

 कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांनी महिला कर्मचार्‍यांकडून सेवासातत्यासाठी पैसे घेतले असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला पाचशे रुपये देण्याबाबत दबाव आणत होते. पैशांची पूर्तता करीत नसल्यामुळे वारंवार मेमो काढून वैद्यकीय अधिकारी त्रास देत आहेत, अशी तक्रार तीन महिला वैद्यकीय अधिकारी आणि दोन आरोग्यसेविकांनी केली आहे, तसेच यांच्या या गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कन्नड ग्रामीण रुग्णालयात तीन पथक कार्यान्वित आहेत. वर्षभरात शाळा व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून तपासणी अहवाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करणे हे या पथकाचे काम आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत या पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाते; तथापि ही पथके त्या त्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या अधिपत्याखाली काम करतात. पथकातील वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्या शिफारशींशिवाय या कर्मचार्‍यांना सेवासातत्य दिले जात नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. देगावकर यांनी पुनर्नियुक्ती सातत्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल घोडके यांच्यामार्फत प्रति वैद्यकीय अधिकारी ३ हजार रुपयांप्रमाणे रक्कम घेतली, तसेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्याबाबत तगादा लावला आहे, अशी तक्रार दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे केली आहे, तर अशाच आशयाची तक्रार एका आरोग्यसेविकेने आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे. एक महिला वैद्यकीय अधिकारी व एका आरोग्यसेविकेने आ. हर्षवर्धन जाधव यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आ. जाधव यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना पत्र देऊन कडक शासन करण्याची मागणी केली आहे. आ. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आपण चौकशीची व संबंधितास कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Accused of taking money; Kannada's medical superintendent and doctor jumped