६० लाकूड कटाई कारखान्यांकडे परवाने, बाकीच्यांवर वन विभागाकडून कारवाईची प्रतीक्षाच

By साहेबराव हिवराळे | Updated: June 5, 2025 16:25 IST2025-06-05T16:18:37+5:302025-06-05T16:25:01+5:30

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात विना फलकाचे लाकूड कटाई कारखाने (सॉ मिल) बिनधास्त व राजरोस सुरू आहेत.

60 timber logging factories have licenses, the rest are awaiting action from the Forest Department | ६० लाकूड कटाई कारखान्यांकडे परवाने, बाकीच्यांवर वन विभागाकडून कारवाईची प्रतीक्षाच

६० लाकूड कटाई कारखान्यांकडे परवाने, बाकीच्यांवर वन विभागाकडून कारवाईची प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शहर वनपरिक्षेत्र परिसरात ६० आरा मशीनना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी लाकूड कटाई नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने चौकशी सुरू केल्याचे सांगितले जाते; पण ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात ५ आरा मशीनवर कारवाई करण्यात आली तरी या मशीन आजही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासात मशीनधारकांनी यंदा कायदेशीररीत्या परवान्याचे नूतनीकरण केले असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र, तरीही त्यांच्या व्यवहाराची तपासणी सुरू आहे. कारण मुळात कापलेली झाडे येतात कुठून, हे अद्यापही स्पष्ट नाही.

वन परिक्षेत्राधिकारी सागर कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अधिकृत कारखानदारांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असून, त्यांच्या आरा मशीनचे रजिस्टर, लाकडांची आवक-जावक यांची नोंद नियमितपणे तपासली जात आहे. तरीही सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप तरी वन विभागाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

विनापरवाना झाड कत्तलीचे काय?
लाकडे आणली कुठून? झाडे कापण्याची परवानगी घेतली होती का? त्यासाठीचे दस्तावेज, रजिस्टर नोंदी आणि कारखान्यावर बोर्ड का लावत नाही? त्याकडे वन विभाग लक्ष का देत नाही? असे विविध प्रश्न अनुत्तरित राहतात. रस्त्याच्या कडेला तोडलेल्या झाडाच्या बदल्यात नवीन झाडे किती लावली, हे देखील वन विभागाने विचारलेले नाही.
- अमोल पट्टेकर, तक्रारदार (सामाजिक कार्यकर्ता)

Web Title: 60 timber logging factories have licenses, the rest are awaiting action from the Forest Department