मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:07 IST2025-10-09T18:07:31+5:302025-10-09T18:07:54+5:30
मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले.

मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आठही जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६४ शाळांमधील वर्ग खोल्यांचे नुकसान झाले. या शाळा दुरुस्त करण्यासाठी ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हानिहाय शाळांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून, पुढच्या आठवड्यात त्याचा अंतिम अहवाल शासनाकडे जाईल, असे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
शासनाने मंगळवारी (दि.७ ) घोषित केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये १० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी असतील, असे नमूद केले आहे. त्यात शाळा दुरुस्तीसाठी रक्कम किती असेल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
२ हजार ४३२ कोटी लागणार...
मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. तलाव, शाळा, महावितरण, शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना, सिंचन व्यवस्था, प्रा. आरोग्य केंद्रांसह सुमारे २ हजार ४३२ कोटींची गरज विभागाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेकडे असलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विभागातील पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान ....
रस्ते....... २७०१ किमी.............१११५ कोटींची गरज
पूल..........१५०४.............५८६ कोटींची गरज
तलाव.........२२२...........१०२ कोटींची गरज
शाळा.......१०६४............४२ कोटींची गरज
महावितरण खांब.....९५६७......३१ कोटी
शासकीय इमारती.......५८......८ कोटी
पाणीपुरवठा योजना......३९२......१७ कोटी
सिंचन व्यवस्था........३९५.......३८४ कोटी
प्रा. आरोग्य केंद्र...........३५२.......१५ कोटी
इतर नुकसान स्थळ..........३२१.....८९ कोटी
राजधानीतील ३२६ शाळांची पडझड....
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२६ शाळांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली. त्यात ११६ शाळा पैठण तालुक्यातील आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ७४, सिल्लोड ३७, सोयगाव आणि कन्नड तालुक्यांत प्रत्येकी २५, तर गंगापूर १२, वैजापूरमधील १० आणि फुलंब्री तालुक्यातील सहा शाळांचे नुकसान झाले आहे.