जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहयो कामाची पाहणी

By Admin | Updated: March 12, 2016 01:17 IST2016-03-12T01:17:27+5:302016-03-12T01:17:27+5:30

तालुक्यातील देवाडा खुर्द येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ..

Inspection of work by District Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहयो कामाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहयो कामाची पाहणी

पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मजुरांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून आपण केलेल्या कामाची मजुरी वेळेत मिळत आहे किंवा नाही, याबाबतची चौकशी केली. तर उपस्थित काही मजुरांचे मस्टरनुसार वेतन मिळतात की नाही याबाबत प्रत्यक्षात त्यांचे बँक पासबुक मागवून तपासणी करण्यात आली.
यावेळी अनेक मजुरांनी काही हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ मजुरांचे वेतन अदा करण्याची तंबी दिली आणि या गावात मजूर क्षमता जास्त असल्याने सेल्पवर कामे वाढवून स्थानिक मजुरांना रोहयो कामापासून वंचीत राहू नये, यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेश संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदारांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत देवाडा खुर्दचे सरपंच विकास मोगरकार, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे, तहसीलदार हरीष गाडे, संवर्ग विकास अधिकारी आनंद बोकरे, मंडळ अधिकारी संजय कानकाटे, तलाठी कानकुलवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inspection of work by District Collector