संघरामगिरीत अवतरला धम्म अनुयायांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:49+5:302021-02-05T07:34:49+5:30

चिमूर : अशोक सम्राटांनी ८४ हजार विहार बांधून बौद्ध धम्म गतिमान केला. त्यामुळेच अनेक भिख्खू जंगलातील, विहार गुहेमध्ये ...

A gathering of Dhamma followers incarnated in Sangramgiri | संघरामगिरीत अवतरला धम्म अनुयायांचा मेळा

संघरामगिरीत अवतरला धम्म अनुयायांचा मेळा

चिमूर : अशोक सम्राटांनी ८४ हजार विहार बांधून बौद्ध धम्म गतिमान केला. त्यामुळेच अनेक भिख्खू जंगलातील, विहार गुहेमध्ये साधना करू लागले. अशोकाच्या काळातील साधनाभूमी म्हणून ओळख असलेल्या संघरामगिरी येथे मागील अनेक वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील हजारो धम्म बांधवानी या धम्म समारंभात येऊन बुद्धाच्या विचारांचा ठेवा घेऊन आपापल्या घरी परतले.

शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्राणपठाचा कार्यक्रम घेण्यात आला. याकरिता कडाक्याच्या थंडीतही धम्मबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. महास्थवीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वंदन केले. याप्रसंगी मंचावर समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद अखिल भारतीय भिक्खू संघ व अनेक भिक्खू उपस्थित होते.

रविवारला समारोपीय कार्यक्रमात भदंत ज्ञानज्योती यांनी तथागथांनी सांगितलेले चार आर्यसत्य यावर प्रकाश टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे झालेत, याकडेही धम्म उपासकाचे लक्ष वेधले. अनेक दाखले देत धम्म अंगिकार केल्याने मानव जातीचा कसा विकास होऊन जीवन सुखकर होते, असाही संदेश देत येणाऱ्या पिढ्याना इतिहासाची जाणीव करून दिली.

या दोन दिवसीय धम्म समारंभाचा समारोप भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांच्या धम्म संदेशानी करण्यात आला.

बॉक्स

संघरामगिरी परिसरात थाटली दुकाने

दोन दिवस चालणाऱ्या धम्म समारंभात येणाऱ्या धम्म बांधवाच्या सुविधेकरिता रविवारी दुसऱ्या दिवशी वनविभागाने दिलेल्या सवलतीमुळे चहा, नास्ता व फोटो, खेळणी, पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले.

बॉक्स

शील व प्रज्ञेच्या प्रेरणेने जागली अख्खी रात्र

तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघरामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपआपल्या गावाला परततात.

Web Title: A gathering of Dhamma followers incarnated in Sangramgiri