सावधान ! तुम्ही लिंबू सरबत पिताय की चक्क 'लिंबू सत्त्व'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 20:02 IST2026-05-11T20:00:35+5:302026-05-11T20:02:23+5:30

Chandrapur : सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, चंद्रपूरचा पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक गारव्यासाठी रस्त्यावरील लिंबू सरबताच्या गाड्यांकडे धाव घेत आहेत.

Be careful! Are you drinking lemonade or 'lemon essence'? | सावधान ! तुम्ही लिंबू सरबत पिताय की चक्क 'लिंबू सत्त्व'?

Be careful! Are you drinking lemonade or 'lemon essence'?

चंद्रपूर : सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, चंद्रपूरचा पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक गारव्यासाठी रस्त्यावरील लिंबू सरबताच्या गाड्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, तुम्ही पित असलेले सरबत खऱ्या लिंबाचे आहे की घातक 'लिंबू सत्त्वा'चे (सायट्रिक अॅसिड), हे तपासणे गरजेचे आहे. अनेक विक्रेते अधिक नफ्यासाठी लिंबाच्या रसाऐवजी स्वस्त पडणाऱ्या लिंबू सत्त्वाचा वापर करतात. त्यामुळे असे लिंबूपाणी प्यायल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. राजीव धानोरकर यांनी दिला.

हॉटेल अन् लग्न समारंभातही वापर

केवळ रस्त्यावरील गाड्याच नव्हे, तर मोठ्या हॉटेल्समध्ये भाज्या आणि डाळींमध्ये आंबटपणा आणण्यासाठी लिंबू सत्त्वाचा वापर वाढला आहे. लग्नाच्या पंगतीमध्ये दिल्या जाणाऱ्या 'मठ्ठा' किंवा 'सरबत'मध्येही हेच रासायनिक सत्त्व वापरले जात असल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

असे ओळखा लिंबू सत्त्व

खऱ्या लिंबू सरबतामध्ये लिंबाचे बारीक कण किंवा थोडासा पांढरटपणा दिसतो. मात्र, लिंबू सत्त्वाचे पाणी काचेसारखे स्वच्छ किंवा कृत्रिम पिवळ्या रंगाचे दिसते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, लिंबू सत्त्वाचा स्वाद लिंबासारखा वाटू शकतो, पण त्याचे दुष्परिणाम शरीराची अंतर्गत यंत्रणा बिघडवू शकतात.

काय आहे लिंबू सत्त्व ?

लिंबू सत्त्व हे प्रामुख्याने बनवलेले रसायनांपासून सायट्रिक अॅसिडचे खडे असतात. हॉटेल चालक, लग्न समारंभआणि रस्त्यावरील हातगाडीवाले लिंबाचा खर्च वाचवण्यासाठी याचा वापर करतात. थोड्याशा सत्त्वामुळे पाण्याला खूप आंबटपणा येतो; मात्र त्यात लिंबाचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नसतात. केवळ आंबट चव आणि कमी खर्च यामुळे व्यावसायिक याला पसंती देत आहेत.

आरोग्यावर होणारे घातक परिणाम

दातांचे नुकसान : लिंबू सत्त्वातील तीव्र अॅसिडमुळे दातांचे संरक्षण कवच कमकुवत होऊन दात खराब होतात.
पोटाचे विकार : अतिसेवनामुळे छातीत जळजळ, गॅस्ट्रिक समस्या आणि अॅसिड रिफ्लक्सचा त्रास वाढतो.
डिहायड्रेशन : नैसर्गिक लिंबूपाणी शरीराला हायड्रेट करते; पण सत्त्वाच्या पाण्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन उलट जुलाब होऊ शकतात.
घसा खराब होणे : या रासायनिक पदार्थामुळे घशाला संसर्ग होऊन आवाज बसणे किंवा खवखव होण्याचे प्रमाण वाढते.

"निसर्गाने दिलेल्या लिंबाचा गुणधर्म 'अमृत' समान आहे. मात्र रासायनिक प्रक्रियेतून बनवलेले लिंबू सत्त्व हे शरीरासाठी एक प्रकारचे हळूहळू चढणारे विष आहे. लिंबू सत्त्वामध्ये कोणतेही जीवनसत्त्वच किंवा पोषक तत्त्वे नसतात. याच्या अतिसेवनाने पित्ताचा प्रकोप वाढतो, ज्यामुळे रक्तातील उष्णता वाढून त्वचेचे विकार उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या पचनसंस्थेवर याचे अत्यंत घातक परिणाम होतात. नागरिकांनी जिभेच्या चवीपेक्षा आरोग्याला महत्त्व देऊन नैसर्गिक फळांच्या रसालाच पसंती द्यावी."
- डॉ. राजीव धानोरकर, आयुर्वेदाचार्य, चंद्रपूर

Web Title : सावधान! क्या आप नींबू पानी पी रहे हैं या हानिकारक साइट्रिक एसिड?

Web Summary : चंद्रपुर के नागरिक संभावित रूप से हानिकारक साइट्रिक एसिड नींबू पानी का सेवन कर रहे हैं। विक्रेता असली नींबू के बजाय सस्ते साइट्रिक एसिड का उपयोग करके लाभ को प्राथमिकता देते हैं। इससे पेट की समस्या, निर्जलीकरण और दांतों को नुकसान हो सकता है। आयुर्वेदिक विशेषज्ञ स्वास्थ्य के लिए प्राकृतिक नींबू पानी का सेवन करने की सलाह देते हैं।

Web Title : Beware! Is That Lemonade or Harmful Citric Acid?

Web Summary : Chandrapur citizens are consuming potentially harmful citric acid lemonade. Vendors prioritize profit using cheaper citric acid instead of real lemons. This can cause stomach issues, dehydration, and damage teeth. Ayurvedic experts advise caution, favoring natural lemon juice for health.