७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार!

By Admin | Updated: May 1, 2017 23:49 IST2017-05-01T23:49:20+5:302017-05-01T23:49:20+5:30

बुलडाणा- २०१७-१८ या वर्षात तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार असून, यातून ५० हजार ८२३ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे.

Soil samples will be tested in 722 villages | ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार!

७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार!

५० हजार नमुने तपासणीचा लक्ष्यांक

नीलेश शहाकार - बुलडाणा
शेत जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्यांकडील शेतातील मातीचे परीक्षण करुन, त्याद्वारे जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरु आहे. २०१७-१८ या वर्षात तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार असून, यातून ५० हजार ८२३ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे.
रासायनिक खतासह अन्य बाबींच्या अतिवापरामुळे खालावलेल्या जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र शासन यंदापासून ‘मृद आरोग्य पत्रिका" अभियान राबवित आहे. पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ५०० गावांना सहभागी करुन घेत, ३० हजार ८९४ मातीचे नमुने तपासण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ९३९ गावांमध्ये ६० हजार माती नमुना परीक्षण जिल्ह्यातील तीन प्रयोगशाळेतून करण्यात आले. या अभियानातून बुलडाणा जिल्ह्यामध्ये ७ लाख ४८ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रातून माती नमुने तपासले जाणार असून, जवळपास ५ लाख ४८ हजार ६६६ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका दिली जाणार आहे.

जैविक खतांचा वापर वाढविण्याचा उद्देश
रासायनिक खताचा वापर कमी करून मृद तपासणीच्या आधारावर अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित मात्रा मिळावी. जैविक खते, सेंद्रिय, गांडूळ, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात ‘मृद आरोग्य पत्रिका अभियान" राबविण्यात येत आहे.

योजनेत सहभागी शेतकऱ्यांची वर्गवारी
अभियानातून माती नमुन्याची आवश्यक तपासणी करता यावी, यासाठी कृषी विभागाने एक हेक्टरपर्यंतचे सिमांतक शेतकरी, दोन हेक्टरपर्यंतचे लहान शेतकरी, पाच हेक्टरपर्यंतचे अर्धमध्यम शेतकरी, दहा हेक्टरपर्यंतचे मध्यम व दहा हेक्टरपेक्षा जास्ती क्षेत्र असलेले मोठे शेतकरी, अशी वर्गवारी केली आहे. मृद आरोग्य अभियानातून दर तीन वर्षांतून एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण होणार आहे.

अशी करणार नमुने तपासणी
बागायती क्षेत्रात वर्गवारी केलेल्यानुसार सिमांतक व लहान शेतकऱ्यांच्या २.५० हेक्टर क्षेत्रामधून एक नमुना, अर्धमध्यम व मध्यम शेतकऱ्यांच्या क्षेत्र परिघातून एक नमुना, तर जिरायती भागात सिमांतक, लहान, अर्ध, मध्यम शेतकऱ्यांच्या १० हेक्टर क्षेत्राच्या परिघात एक; तर मोठ्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील परिघात एक नमुना तपासणीसाठी घेतला जाणार आहे.

Web Title: Soil samples will be tested in 722 villages