ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:01:03+5:30

गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश नगरकर, युवराज सैय्याम, सुरेश बावणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निश्चय केला.

Transformed forms of British Zilla Parishad school | ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे

ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे

Next
ठळक मुद्देलाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील शाळा, ११० वर्षांच्या प्रवासाची ठरली साक्षीदार

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील लाखनी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधुनिक शाळेत रूपांतर झाले आहेत. ब्रिटीश कालखंडात इ.स. १९१० मध्ये स्थापन झालेल्या मुरमाडी तुप. येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याने ही शाळा स्पर्धेच्या युगात डिजिटलायझेशन झाली असल्याने मुरमाडी तुपकरचा नाव लौकीक वाढला आहे.
गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश नगरकर, युवराज सैय्याम, सुरेश बावणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निश्चय केला. आणि शाळेला बदलण्याचा ध्यास घेतला. तेव्हापासून मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेत गावासह परिसरातील शिक्षणप्रेमी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शाळा विकासाबाबत चर्चा केली.
हळूहळू गावकºयांसह पदाधिकाऱ्यांचा वाढता सहभाग आणि पालकांच्या मदतीने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जावू लागले. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी दर महिन्याला पालक सभा घेतली जाते. पालक सभेत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आढावा तसेच चुका दाखवून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना बालवयातच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी यासाठी इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून दर शनिवारी परीक्षा घेतली जाते.
विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण देवून गरजेचे नाही तर व्यवहाराचेही धडे देण्यासाठी शाळेत दीड वर्षापुर्वी विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली. या बचत बँकेतून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दोन लाख रूपये जमा केले आहेत. विद्यार्थ्यांना परिसरातील उद्योगधंदे, सहकारी संस्था, पर्यावरणाची माहिती मिळावी यासाठी प्रात्यक्षिकांच्या भेटी आयोजित केल्या जातात. शाळेत एक पशस्त सुशोभित इमारत उभी असून शाळेत बोलक्या भिंती, डिजिटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा अशा विविध सुविधांयुक्त शाळा असल्याने विद्यार्थी शाळेत रमत आहेत. याशिवाय शाळेत परिसर भेट, परसबाग, स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी, परीपाठ उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध नवनवीन प्रयोग राबविले जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने राघवेंद्र निरगुडे यांनी सांगितले.

Web Title: Transformed forms of British Zilla Parishad school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा