भंडाऱ्यात राहणाऱ्या नागपुरातील किरायेदाराच्या घरात सापडला १२.६५ लाखांचा एमडी पावडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:12 IST2026-05-09T17:06:11+5:302026-05-09T17:12:07+5:30
Bhandara : रोजगारासाठी शहरात राहण्यासाठी आल्याचे सांगून भाड्याचे घर घेऊन राहणाऱ्या भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात राहणाऱ्या कपिल गंगाधर खोब्रागडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

MD powder worth Rs 12.65 lakhs found in the house of a tenant from Nagpur living in Bhandara
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रोजगारासाठी शहरात राहण्यासाठी आल्याचे सांगून भाड्याचे घर घेऊन राहणाऱ्या भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात राहणाऱ्या कपिल गंगाधर खोब्रागडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या किरायाच्या घरातून १२ लाख ६५ हजार रुपयांचा एमडी पावडर जप्त करण्यात आला असून ७९,९६० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज विरोधी कारवाईमध्ये पोलिसांच्या हातात नवा धागा लागला आहे.
८ मे रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही गोपनिय माहिती हाती लागली. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मोहीम आखण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांना तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या नेतृत्वात टीम तयार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर हे पथक मोहीमेवर रवाना झाले.
या पथकाने आंबेडकर वॉर्डातील समाज भवनाजवळील पुरुषोत्तम रामटेके यांच्या घरी किरायाने राहत असलेल्या कपिल गंगाधर खोब्रागडे याच्या घरी धाड घातली असता, ६३.२१० ग्रॅम एम.डी. सदृश्य पावडर (अंदाजे किंमत १२ लाख ६५ हजार रुपये) रोख ७९ हजार ९६० रुपये आणि २,३०० रुपये किंमतीचे अन्य साहित्य असा १३ लाख ४७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २२(क) अन्वये भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी अमली पदार्थ विक्रीविरोधात उघडलेल्या मोहीमेला मोठे यश आले आहे.