पेट्रोलपंपांवर हवा, पाणी, शौचालयाचा अभाव;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:18+5:302021-06-10T04:24:18+5:30

पंपमालकांची मनमानी सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष रवींद्र चन्नेकर बारव्हा : पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना मोफत हवा, पाणी, शौचालयाची व्यवस्था ...

Lack of air, water, toilets at petrol pumps; | पेट्रोलपंपांवर हवा, पाणी, शौचालयाचा अभाव;

पेट्रोलपंपांवर हवा, पाणी, शौचालयाचा अभाव;

पंपमालकांची मनमानी सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष

रवींद्र चन्नेकर

बारव्हा : पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना मोफत हवा, पाणी, शौचालयाची व्यवस्था करणे पेट्रोलपंप मालकांना अनिवार्य करण्यात आले आहे. परंतुृ लाखांदूर तालुक्यातील पेट्रोलपंपांवर या सर्व सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. फक्त लाखांदूर तालुक्यात नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर असे प्रकार दिसून येत आहेत. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पेट्रोलपंप मालकांचेे चांंगलेच फावले असून, त्यांची मनमानी देखील वाढली आहे.

लाखांदूर तालुक्यात चार पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपांची पाहणी केली असता, ग्राहकांना पाहिजे त्या अनिवार्य सेवा देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोलपंपावर मोफत हवा देणे बंधनकारक आहे. ग्राहक पेट्रोलपंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर तो मोफत हवा भरून घेऊ शकतो.

मात्र, लाखांदूर तालुक्यातील पेट्रोलपंपांवर मोफत हवा भरून देण्याची सोय नाही. काही ठिकाणी हवा भरण्यासाठी मशीन बसविण्यात आल्या आहेत. परंतु, मशीन बंद असल्याचे दिसते. बंद पडलेल्या मशीनजवळील जागा पेट्रोलपंप चालकांनी पंक्‍चर काढणाऱ्यांना दिल्या आहेत. त्या ठिकाणी मोफत हवा भरून देण्यात येत नाही. त्याठिकाणी दुचाकी चालकांकडून हवा भरण्याचे पाच रुपये, कार चालकांकडून दहा रुपये घेतले जातात.

प्रत्येक पेट्रोलपंपावर पिण्याच्या थंड व गरम पाण्याची सोय करणे बंधनकारक आहे. परंतु, एकाही पेट्रोलपंपावर या प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. काही पेट्रोलपंपावर स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यामध्ये पाण्याची सोय नाही. त्यामुळे स्वच्छतागृह असून, ते केवळ दाखविण्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे. सर्व सुविधांचा अभाव असताना प्रशासनाला मात्र हे दिसत नाही.

बॉक्स

सुविधांचा अभाव

प्रत्येक पेट्रोलपंपावर प्रथमोपचार पेटी ठेवणे आवश्‍यक आहे. प्रवासादरम्यान गरज पडल्यास पेट्रोलपंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्‍सचा वापर करून प्रथमोपचार केला जाऊ शकतो. परंतु, एकाही पेट्रोलपंपावर फर्स्ट एड बॉक्‍स ठेवण्यात आल्याचे दिसले नाही. पेट्रोलपंपावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.

बॉक्स

तक्रार पुस्तक नाही

पेट्रोलपंपावर इंधन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा नंबर लिहिणे आवश्‍यक असते. ग्राहकाची काही तक्रार असल्यास थेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार करता येते. त्याचबरोबर तक्रार पुस्तिकाही पेट्रोलपंपावर उपलब्ध नसते.

Web Title: Lack of air, water, toilets at petrol pumps;