मीठ टंचाईच्या अफवेने खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:47+5:30

कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगून कृत्रीम तुटवडा निर्माण केला जात आहे.

Crowds for shopping on rumors of salt scarcity | मीठ टंचाईच्या अफवेने खरेदीसाठी गर्दी

मीठ टंचाईच्या अफवेने खरेदीसाठी गर्दी

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात चढत्या दराने विक्री : अन्न पुरवठा विभागाच्या आदेशाची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊन काळात मिठाचा तुटवडा असल्याचे सांगून जिल्ह्यात अफवा पसरविली जात आहे. याचे परिणाम दिसून येत असून मीठ खरेदीसाठी नागरिकांनी किराणा दुकानात एकच गर्दी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे याचा काही किराणा व्यवसायीक फायदा घेत असून चढत्या दराने मिठाची विक्री करीत आहे. ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास घडत आहे.
कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगून कृत्रीम तुटवडा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे शासनाने जीवनावश्यक वस्तुच्या पुरवठ्याबाबत दक्षता घेतली असून या वस्तुंचा साठेबाजार करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न पुरवठा विभागांतर्गत कठोर निर्देश देण्यात आले आहे.
लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात महिला पुरुष नागरिक सकाळपासूनच मीठ खरेदीसाठी एकच धावपळ करीत आहेत. आंतरराज्यातून मिठाची आयात होत नसल्याची भीती दाखवून मिठाच्या तुटवड्याची संभाव अफवा पसरताच मीठ खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. याचाच फायदा व्यवसायीक घेत असून चढत्या दराने मीठाची विक्री केली जात आहे. यासंदर्भात लाखांदूर तालुका किराणा संघटन असोसिएशनचे अध्यक्ष बंटी सहजवाणी म्हणाले, जीवनावश्यक वस्तुचा तुटवडा भासविणे चुकीचे आहे. तालुक्यात जीवनावश्यक वस्तुचा कुठेही तुटवडा नाही. नागरिकांनी या अफवाना बळी न पडता, योग्य दरातच जीवनावश्यक वस्तु व पदार्थांची खरेदी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लाखनी तालुक्यातील अनेक गावातही मिठाच्या टंचाईबाबत अफवा पसरविल्याने किरकोळ दुकानदार मिठाची अधिक भावाने विक्री करीत आहेत. तालुक्यात मात्र मिठाची कुठलीही टंचाई नाही. पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार गावासह परिसरात दुप्पट किंमतीत मीठ विकले जात आहे. काही ठिकाणी दुप्पट किंमत देवूनही मीठ मिळत नसल्याची तक्रार आहे. मीठ १०० रुपये किलोने मिळणार अशी अफवाच गावात पसरविण्यात आली. छत्तीसगढ राज्यात मीठाचा तुटवडा भासल्याने तेथील काही लोकांनी जिल्ह्यात असलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींना भ्रमणध्वनीवरुन सांगितले. याचेच पडसाद गाव व जिल्ह्यात पहायला मिळत आहे. १५० रुपयाला मिळणारी मीठाची पोती २०० रुपये भावाने मिळत आहे. याबाबत येथील किराणा व्यापारी इद्रीस लध्दानी म्हणाले, मीठ टंचाईबाबत अफवा पसरविली जात असून खोट्या अफवांना कुणीही बळी पडू नये. पालांदूरात एक-दोन दिवसात मीठाचा मुबलक साठा प्राप्त होणार आहे.

सकाळी सकाळी पसरली अफवा
मिठाची टंचाई निर्माण झाल्याची सकाळी सकाळी कुठूनतरी ग्रामीण भागात अफवा पसरली. मिठाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याच्या वार्ता गावभर चर्चील्या जाऊ लागल्या. ही चर्चा वाऱ्यासारखी पसरताच किराणा दुकानात गर्दी उसळू लागली. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही अनेकांनी आवश्यकतेपेक्षा अधिक मीठ खरेदीचा सपाटा लावला. मात्र ही अफवा नेमकी कशी आणि कुणी पसरविली याचा दिवसभरही थांगपत्ता लागला नाही.

Web Title: Crowds for shopping on rumors of salt scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.