वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:40 IST2026-05-04T13:39:00+5:302026-05-04T13:40:58+5:30
Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi May 2026: २०२६ मध्ये दुसऱ्यांदा संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग जुळून येत आहे. चंद्रोदय वेळ, पूजा विधी याबाबत सविस्तर जाणून घ्या...

वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi May 2026: सन २०२६चा मे महिना सुरू झाला आहे. तर मराठी वर्षाचा दुसरा वैशाख मास सुरू आहे. वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जयंती साजरी केल्यानंतर आता संकष्ट चतुर्थीला अद्भूत, अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. सन २०२६ मध्ये संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग जुळून येण्याची ही दुसरी वेळ आहे. वैशाख महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी कधी आहे? अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन कसे करावे? राहु काल कधी आहे? जाणून घेऊया...
कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण, पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी, यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. मराठी वर्षाच्या वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे.
प्रत्येक मराठी महिन्यात संकष्टीचे व्रत, पण अंगारक योग दुर्मिळ
प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. त्यामुळेच या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते असे मानले जाते.
वैशाख महिन्यातील अंगारक योग संकष्ट चतुर्थी कधी?
मराठी वर्षाच्या वैशाख मासात मंगळवार, ०५ मे २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. या दिवशी पहाटे ०५ वाजून २४ मिनिटांनी वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी सुरू होत असून, ०६ मे २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत संकष्ट चतुर्थी असणार आहे. याचाच अर्थ ही अंगारकी संकष्टी चतुर्थी अहोरात्र असणार आहे. या दिवशी दुपारी ०३ वाजेपासून ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राहु काल आहे.
चतुर्थीला अंगारक योगाचे महत्त्व
मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.
अंगारक संकष्ट चतुर्थीला गणेश पूजन कसे करावे?
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.
अंगारक संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाला की काय कराल?
रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते.
अंगारक संकष्ट चतुर्थी मे २०२६ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
| शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
| मुंबई | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
| ठाणे | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
| पुणे | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
| रत्नागिरी | रात्रौ १० वाजून १२ मिनिटे |
| कोल्हापूर | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
| सातारा | रात्रौ १० वाजून ११ मिनिटे |
| नाशिक | रात्रौ १० वाजून १८ मिनिटे |
| अहिल्यानगर | रात्रौ १० वाजून १२ मिनिटे |
| धुळे | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
| जळगाव | रात्रौ १० वाजून १३ मिनिटे |
| वर्धा | रात्रौ १० वाजून ०० मिनिटे |
| यवतमाळ | रात्रौ १० वाजून ०१ मिनिटे |
| बीड | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
| सांगली | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
| सावंतवाडी | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
| सोलापूर | रात्रौ १० वाजून ०३ मिनिटे |
| नागपूर | रात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे |
| अमरावती | रात्रौ १० वाजून ०४ मिनिटे |
| अकोला | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
| छत्रपती संभाजीनगर | रात्रौ १० वाजून ११ मिनिटे |
| भुसावळ | रात्रौ १० वाजता १२ मिनिटे |
| परभणी | रात्रौ १० वाजून ०४ मिनिटे |
| नांदेड | रात्रौ १० वाजून ०१ मिनिटे |
| धाराशीव | रात्रौ १० वाजून ०४ मिनिटे |
| भंडारा | रात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे |
| चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
| बुलढाणा | रात्रौ १० वाजून ०९ मिनिटे |
| मालवण | रात्रौ १० वाजून ०९ मिनिटे |
| पणजी | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
| बेळगाव | रात्रौ १० वाजून ०५ मिनिटे |
| इंदौर | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
| ग्वाल्हेर | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥