नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

By देवेश फडके | Published: February 24, 2024 04:06 PM2024-02-24T16:06:33+5:302024-02-24T16:12:56+5:30

Navgrahanchi Kundali Katha: चंद्राला धार्मिक, सांस्कृतिक आणि खगोलीय दृष्टिने अनन्य साधारण महत्त्व आहे. तुमच्या कुंडलीत चंद्र कोणत्या स्थानी आहे? जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about importance of moon planet and astrology remedies of chandra graha and effect on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

देवेश फडके.

Navgrahanchi Kundali Katha: खगोलीय दृष्टीने विचार केल्यास चंद्र तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहे. चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चांद्र मास हा तीस दिवसांचा असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे असते. हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी कमी असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. यालाच अधिकमास म्हटले जाते. राहिलेली तफावत दूर करण्यासाठी १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो. आतापर्यंत जगातील अनेक देशांनी चंद्रावर अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. चंद्रावर पाऊल ठेवत मानवाने इतिहास रचला. 

भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली अन् ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. चंद्रासंदर्भात विविध विषयांचा अभ्यास यातून केला जाणार आहे. वर्षभरात येणारी विविध प्रकारची चंद्रग्रहणे पृथ्वीवर तसेच मानवी जीवनावर प्रभावकारी मानली जातात. भारतीय संस्कृती परंपरांमध्ये चंद्राला विशेष महत्त्व आहे. श्रीरामाने लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा सुमंतांनी आरशात चंद्राचे प्रतिबिब दाखवून रामाला खुश केले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. एवढेच नव्हे तर मराठी महिन्यातील प्रत्येक वद्य चतुर्थीला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. 

चंद्राशी निगडीत काही मंत्र आणि उपाय

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥, हा नवग्रह मंत्रातील चंद्राचा मंत्र आहे. याशिवाय, ॥ ॐ सों सोमाय नम:॥, ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥ हे चंद्राचे प्रभावी मंत्र मानले जातात. ॥ ॐ पद्मद्वाजय विद्महे हेमा रूपाय धीमहि तन्नो चंद्र: प्रचोदयात् ॥, हा चंद्राचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. यामध्ये महादेव शंकराची उपासना करणे, सोमवारचे विशेष व्रत करणे, पौर्णिमेचे व्रत करणे, चंद्र मंत्राचा यथाशक्ती किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने जप-जाप करणे, चंद्राचे रत्न मोती धारण करणे, चंद्राशी संबंधित वस्तू जसे की, दूध, चांदी, पांढरे वस्त्र यांचे दान करणे, असे काही उपाय सांगितले जातात.

चंद्र ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...

कधी पूर्ण होणारा तर कधी क्षय पावणारा असा ग्रह चंद्र आहे. या क्षय वृद्धीमुळे चंद्राच्या फलितात फरक पडतो. कोणा एका भावात पूर्ण चंद्र असेल तर त्याचे फल वेगळे व क्षीण चंद्र-कृष्णपक्षातील अष्टमीच्या मनातल शुक्लपक्षांतील अष्टमीपर्यंतचा चंद्र असेल तर फलित वेगळे येईल. फक्त लग्न स्थानी नव्हे तर प्रत्येक भावात हाच अनुभव येतो. म्हणून चंद्राचे फलित सांगताना सारासार विचार करून विवेकपूर्ण फलित सांगावे लागते, असे सांगितले जाते. नवग्रहांची ‘कुंडली’कथा या मालिकेतील दुसऱ्या चंद्र ग्रहाच्या लेखातील द्वितीय भागात कुंडलीतील सात ते बारा या स्थानी चंद्र असेल तर त्याचा प्रभाव कसा असू शकतो, हे आता पाहुया...

७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानीचा चंद्र संमिश्र फले देतो. चंद्र शुभ व बलवान असेल तर शुभ फल अधिक प्रमाणात मिळते. निर्बल व क्षीण चंद्र असेल तर अशुभ फल मोठ्या प्रमाणात मिळते. व्यापारात लाभ देतो. अशा जातकाने दैनंदिन उपयोगांत येणाऱ्या वस्तूंचा व्यापार, ट्रान्सपोर्टचा उद्योग केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. खाण्यापिण्याचा शौक असतो. पत्नीसुख चांगले मिळते. जातक अभिमानी-मत्सरी असतो. त्याला सासरकडून किंवा पत्नीच्या नातेवाइकांकडून पैसा मिळतो. 

८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानातील चंद्र अधिक निषिद्ध व अशुभ फलसूचक मानण्यात आला आहे. आरोग्यरक्षक व तारक असे इतर योग कुंडलीत नसतील तर अष्टमातील चंद्र आयुष्यभर शरीरप्रकृतीच्या काही ना काही तक्रारी सुरू ठेवतोच, असे मानले जाते. तसेच जातक विवेकवान, बुद्धिवान, उदार, विनोदी व लढवय्या स्वभावाचा असतो. ही अष्टमस्थ चंद्राची शुभफले होते. यूनानी ज्योतिषाचार्यांच्या मते अष्टमस्थ चंद्र असता जन्मापासून आठवा दिवस, आठवा महिना, आठवे वर्ष जातकाला अनिष्ट ठरते. पाश्चात्त्य ज्योतिषाचार्यांच्यामते अष्टमस्थ चंद्र स्वगृही, उच्च, वर्गोत्तम इत्यादिमुळे वारसाहक्काने, विवाहामुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे दुसऱ्याच्या संपत्तीचा लाभ जातकाला मिळतो.

९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानातील चंद्र, बहुधा चांगली फले देतो. असा जातक सामाजिक कार्यकर्ता, व्यवहारकुशल, जनप्रिय, कामातूर, समाजात प्रतिष्ठित, भ्रमणप्रिय असतो. देश-विदेशात प्रवासाच्या संधी मिळतात. अशा जातकाचा भाग्योदय २४ व्या वर्षी होतो. परंतु चांगली प्रगती विलंबाने म्हणजे मध्यायुत होते. बहुधा असा जातक विचारवंत व सदाचरणी असतो. 

१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानीचा चंद्र उदरनिर्वाहाच्या बाबतीत चांगली फले देतो. असा जातक सदाचारी, धार्मिक प्रवृत्तीचा असतो व सुखी-संपन्न जीवन जगतो. राजद्वारीही सन्मान लाभतो. व्यापार केला, तर चांगली प्रगती होते. नोकरी व व्यवसाय वारंवार बदलण्याकडे प्रवृत्ती असते. कौटुंबिक व वैवाहिक जीवन सुखी असते. भाग्योदय २४ वर्षी होतो. ४३ वे वर्ष अत्यंत महत्वपूर्ण उरते. आर्थिक स्थितीत खूप चढ-उतार होतो. जातक आई-वडिलांचा भक्त व कुटुंबाचा आधार असतो. या स्थानी असलेल्या चंद्राशी मंगळ किंवा शनि युतीत असेल तर चांगली फले मिळतातच असे नाहीत. मेष, कर्क, तूळ, किंवा मकर या चार राशीत चंद्र असेल तर नोकरी-व्यवसायात बदल होतात. अस्थिरतेमुळे प्रगतीत बाधा उत्पन्न होते. सार्वजनिक जीवन यशस्वी असते.

११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तु, मित्र स्त्रिया यांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानीचा चंद्र खूपच चांगली फले देतो. असा जातक संपन्न, सुखी समाजात व राजद्वारी मोठी प्रतिष्ठा असलेला असतो. उच्च सन्मान मिळतो. शरीरिक दृष्ट्या हा चंद्र मध्यम फलदायी असतो. जातक उदार, सदाचारी, परोपकारी असतो. मित्रांकडून सुख-सहकार्य मिळते. दृढप्रतिज्ञ नसल्यामुळे कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. प्रत्येक कार्यात अडचणी येतात. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांच्या मते अशा जाताकाला पशुधन व मोटार इत्यादींपासून लाभ होतो. जन्मापासून ११, १६ व १७ व्या वर्षी राजसन्मान मिळू शकतो. काही ना काही फायदा होतो.

१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानातील चंद्राची फले बहुधा चांगली मिळत नाहीत. जातक खर्चिक असतो. परंतु सत्कार्यात खर्च करतो. आर्थिक बाबतीत अन्य ग्रहांचा योग चांगला नसेल तर जातक ऋणग्रस्त होतो. इतरांच्या मत्सरामुळे शत्रू फार होतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात योग्य मान मिळत नाही. शरीरप्रकृतीच्या दृष्टीने आळशी व दुर्बल असतो. जातक सदाचारी, सौम्य प्रकृतीचा असतो. अशा जातकाने विवाहाच्या वेळी काळजी घ्यावी. कौटुंबिक सुख नसते. आई-वडील, चुलते यांच्याशी पटत नाही. कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाही.  पाण्यापासून भय राहते. विद्वान असूनही याच्या विद्वत्तेचा प्रभाव समाजावर पडत नाही. जातक खादाड, दुराचारी, कुलांगार, शरीरात कोणता तरी विकार असणारा, हिंसक प्रवृत्तीचा असतो. मात्र, असे जातक फार कमी आढळले आहेत. वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशीचा चंद्र व्ययस्थानी असतां अशी फले दिसून येऊ शकतात. इतर राशीत चंद्र असता अशी फले मिळत नाहीत.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: navgrahanchi kundali katha know about importance of moon planet and astrology remedies of chandra graha and effect on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.