Motivational Story: तुम्हाला उडणाऱ्या घोड्याची गोष्ट माहितीय? एकदा वाचा, अतिविचार करणे सोडून द्याल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 07:10 IST2026-05-07T07:07:07+5:302026-05-07T07:10:02+5:30

Motivational Story: अतिविचार करण्याची सवय आपल्या सगळ्यांनाच लागलेली आहे, यातून बाहेर काढणारी आणि मनाला दिलासा देणारी ही गोष्ट अवश्य वाचा. 

Motivational Story: Do you know the story of the flying horse? Read it once, you will stop overthinking! | Motivational Story: तुम्हाला उडणाऱ्या घोड्याची गोष्ट माहितीय? एकदा वाचा, अतिविचार करणे सोडून द्याल! 

Motivational Story: तुम्हाला उडणाऱ्या घोड्याची गोष्ट माहितीय? एकदा वाचा, अतिविचार करणे सोडून द्याल! 

एका राजाकडे दोन सेवक होते. दोघेही राजाला प्रिय होते. अत्यंत कामसू, अभ्यासू, जिज्ञासू होते. राजाच्या प्रत्येक कामात ते मदत करत असत. मात्र एकदा दोघांकडून एक भयंकर मोठी चूक झाली. राजाने तर त्या दोघांना फाशीवर लटकवण्याचे भर सभेत फर्मान काढले. 

राजाच्या या निर्णयाने दोन्ही सेवक आणि दरबार चकित झाला. कारण राजा आपल्या अत्यंत प्रिय, विश्वासू सेवकांना प्राणदंड देईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. राजाने निर्णय दिला. दोघे गयावया करू लागले. राजा आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तेव्हा एका सेवकाने राजाला विनंती केली. 

दोघांपैकी एक सेवक म्हणाला, 'राजन, मला एक वर्षांची सवलत द्या. माझ्या अंगी असलेल्या कला तुम्ही जाणता. मला किती विद्या अवगत आहेत हेही तुम्हाला माहीत आहेच. मी त्या सर्वांचा वापर करून तुमच्या घोड्याला वर्षभरात उडवायला शिकवेन!' 

हे ऐकताच राजासकट सगळा दरबार हसू लागला. राजा म्हणाला, मृत्यू टाळण्यासाठी जरा बरं तरी कारण निवडायचं होतंस! घोडा कधी उडू शकतो का?'

सेवक म्हणाला, 'राजन, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या घोड्याला मी उडायला शिकवतो. तो नाही उडाला तर तुम्ही वर्षभराने मला फासावर द्या. मात्र त्याआधी तुमच्यासाठी ही शेवटची सेवा करण्याची संधी द्या. घोडा खरोखरच उडू लागला तर विचार करा तुमचा कोणत्याही युद्धात कधीच पराभव होणार नाही.' 

हे ऐकून राजाने थोडा विचार केला आणि त्याची मागणी पूर्ण केली. एकाला कोठडीत तर एकाला फासावर नेण्यासाठी रवाना केले. 

दोघांनाही सैनिक पकडून नेत असताना दुसरा सेवक पहिल्याला म्हणाला, 'तू वेडा झालाय का? घोड्याला कसं काय उडायला शिकवणार आहेस तू? आज ना उद्या तुलाही मरावं लागणार हे नक्की!' 

त्यावर पहिला सेवक म्हणाला, 'अगदी बरोबर! मृत्यू तर प्रत्येकाला येणारच आहे. पण निदान मला वर्षभरासाठी जीवनदान मिळाले आणि यातच मी चार शक्यता माझ्यासाठी निर्माण केल्या. कोणत्या त्या सांगू?' 

१. या वर्षभरात राजा मेला तर मला फाशी कोण देणार?
२. या वर्षभरात मी मेलो तर फाशीची शिक्षा रद्द होणार.
३. या वर्षभरात घोडा मेला तर मी कोणाला उडायला शिकवणार? 
४. आणि खरोखरच घोडा उडायला शिकला तर माझे प्राण वाचणार!

थोडक्यात आजचं मरण पुढे ढकलताना मी माझ्यासाठी जगण्याचे चार पर्याय उपलब्ध केले. 

छोटीशी गोष्ट शिकवते, वाईटात वाईट प्रसंगात उमेद सोडू नका, ती देखील तुम्हाला सोडणार नाही, मार्ग दाखवेल आणि तुम्हाला जीवनदान मिळेल. त्यामुळे अतिविचार, अतिकाळजी सोडा आणि आशेचा किरण सापडतोय का? तो शोधण्याचा प्रयत्न करा!

Web Title : प्रेरक कहानी: क्या आप अति सोचते हैं? उड़ने वाला घोड़ा आशा देता है।

Web Summary : एक राजा दो सेवकों को मौत की सजा सुनाता है। एक सेवक घोड़े को उड़ना सिखाने के लिए एक वर्ष का समय मांगता है, जिससे बचने के चार विकल्प बनते हैं और निराशा में भी आशा का महत्व उजागर होता है।

Web Title : Motivational story: Overthinking? A flying horse tale offers hope.

Web Summary : A king sentences two servants to death. One bargains for a year to teach the king's horse to fly, creating four possibilities to escape death and highlighting the importance of hope in dire situations.