मोहिनी एकादशी २०२६: केवळ उपास नाही, तर मनाची शुद्धी; मोहिनी एकादशीला पापमुक्ती देणारा पूजाविधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:05 IST2026-04-25T09:01:03+5:302026-04-25T09:05:02+5:30
मोहिनी एकादशी २०२६: २७ एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे, हे व्रत प्रभू श्रीरामांनी तथा पांडवांनीही केले होते, जाणून घ्या व्रतलाभ आणि विधी.

मोहिनी एकादशी २०२६: केवळ उपास नाही, तर मनाची शुद्धी; मोहिनी एकादशीला पापमुक्ती देणारा पूजाविधी!
सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी 'मोहिनी एकादशी' आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहीत आहेच, मोहिनी एकादशीचे महत्त्वही जाणून घेऊ.
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही 'मोहिनी एकादशी' ही विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की, या दिवशी विधीवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्मांच्या पापांतून मुक्ती मिळते.
मोहिनी एकादशीचे पौराणिक महत्त्व
समुद्रमंथनावेळी जेव्हा अमृत बाहेर आले, तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एका अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला 'मोहिनी' अवतार म्हटले जाते. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्यांची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला, तीच 'मोहिनी एकादशी' म्हणून ओळखली जाते.
हे ही वाचा : Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
पूजा विधी (कशी करावी पूजा?)
१. संकल्प: एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रत करण्याचा संकल्प करावा.
२. स्थापना: पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
३. साहित्य: भगवंतांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि धूप-दीप अर्पण करावा. (लक्षात ठेवा, तुळशीशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही).
४. भोग: भगवंतांना केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
५. कथा आणि आरती: मोहिनी एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी विष्णूंची आरती करावी.
६. जागरण: शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा भजन-कीर्तन करावे.
७. पारण: दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला गरजू व्यक्तीला दान देऊन स्वतः उपवास सोडावा.
हे ही वाचा : सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
या व्रताचे फायदे
>> त्रेतायुगात प्रभु श्रीरामांनी आणि द्वापरयुगात धर्मराज युधिष्ठिराने देखील हे व्रत केले होते.
>> हे व्रत केल्याने मनुष्यातील मोह आणि मायेचे पाश तुटतात आणि मन शुद्ध होते.
>> आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.