समाजात लिंगभाव संवेदनशीलता रुजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:57+5:302021-07-25T04:27:57+5:30

बीड : आजच्या एकविसाव्या शतकात, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांना असमानतेची मिळणारी वागणूक हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असून, समाजात ...

There is a need to inculcate gender sensitivity in the society | समाजात लिंगभाव संवेदनशीलता रुजणे गरजेचे

समाजात लिंगभाव संवेदनशीलता रुजणे गरजेचे

बीड : आजच्या एकविसाव्या शतकात, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांना असमानतेची मिळणारी वागणूक हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असून, समाजात महिला-पुरुष समानतेच्या दृष्टीने लिंग संवेदनशीलता रुजणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या लेप्टनंट डाॅ. सुलक्षणा जाधव यांनी केले.

बलभीम महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने दि.२२ जुलैरोजी 'लिंग संवेदनशीलता' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप, उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. सुलक्षणा जाधव म्हणाल्या की, आजही महिलांना असमानतेमुळे अनेक समस्यांना समोर जावे लागते. मुलींना लहानपणापासूनच घरात असमानतेची वागणूक मिळते. तू मुलगी आहे, तू अशी वागू नको, अशाप्रकारे घरातूनच असमानतेची सुरुवात होते. मग समाजातही हीच स्थिती दिसते. आपला देश हा विकसनशील देश आहे व विकसित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, लिंग संवेदनशीलतेच्या अभावामुळे आपण जगाच्या तुलनेत मागे असून, विकसित होण्याच्या गतीत २० वर्षे मागे गेलो आहोत. लिंग संवेदनशीलतेच्याबाबतीत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असून, घरात पालकांनी, तर शाळा, महाविद्यालयात शिक्षकांनी ही असमानता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या लेप्टनंट डाॅ. सुनीता भोसले यांनी केले, तर आभार यश्वी भाटी यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे लेप्टनंट डाॅ. शैलेश आकुलवार यांच्यासह विभागाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: There is a need to inculcate gender sensitivity in the society