सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 01:10 IST2025-03-14T01:09:02+5:302025-03-14T01:10:25+5:30
Satish Bhosale House News Marathi: खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर वनविभागाने पाडले. त्यानंतर पाडलेले घर जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Satish Bhosale news Marathi: मारहाण, वन्य प्राण्याची शिकार केल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वनविभागाने सतीश भोसलेल्या घरावर बुलडोजर चालवला. गुरुवारी (१३ मार्च) दुपारी घर पाडण्यात आले. त्यानंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली. काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात काही जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे. इथे एक वस्ती बसलेली होती. मात्र, सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले. त्यानंतर वनविभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती. इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले. तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते.
मालकी हक्क दावा करण्यासाठी सात दिवसांची दिली होती मुदत
वनविभागाच्या गट क्रमांक ५१ मध्ये सतीश भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले होते. या प्रकरणी वनविभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. या जागेवर मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला होता. पण, त्याच्याकडून कोणताही दावा न करण्यात आल्याने बुलडोजरने हे घर पाडण्यात आले.
रात्री हल्ला, घराला लावली आग
सतीश भोसले याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, २० ते २५ लोक होते. तोंड बांधलेली होती. त्यांनी अचानक हल्ला केला. आणि त्यानंतर घर पेटवून दिले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुटुंबीयांना मदत केली.
घराला आग लावण्याच्या घटनेवर अंजली दमानियांची टीका
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं? नाही, हे योग्य नाही. मला खरंच खूप वाईट वाटतंय", असे अंजली दमानियांनी म्हटले आहे.