केजमध्ये गरिबांच्या घरकुलावर डल्ला, ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:07 IST2026-04-25T20:06:02+5:302026-04-25T20:07:32+5:30
४ कोटी २४ लाखांचा घरकुल निधी गायब; निवृत्त मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा

केजमध्ये गरिबांच्या घरकुलावर डल्ला, ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा
केज (जि. बीड): येथील नगरपंचायतीमध्ये 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या निधीत ४ कोटी २४ लाख ७३ हजार रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या या टोळीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
असा झाला ४ कोटींचा 'डबल गेम'
२० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा निधी नियबाह्य पद्धतीने वापरला. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक असताना, तो इतर अनधिकृत खात्यांवर वळवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या समितीने सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गुन्हा दाखल झालेले आरोपी:
मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे:
१. मिलिंद सावंत (तत्कालीन मुख्याधिकारी, सेवानिवृत्त)
२. असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल)
३. लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक)
४. भास्कर एकनाथ ससाणे (व्हॅल्वमन)
५. भीमराव शामराव मस्के
६. बाशेद वलियोद्दीन काझी