बेकायदेशीर नावे केलेल्या जमीन प्रकरणांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:37+5:302021-06-01T04:25:37+5:30

बीड : बीड जिल्ह्यात २०१५ ते २०२१ या काळात विविध देवस्थानांच्या जमिनी, इनामी जमिनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून ...

Order of inquiry into land cases made in illegal names | बेकायदेशीर नावे केलेल्या जमीन प्रकरणांच्या चौकशीचे आदेश

बेकायदेशीर नावे केलेल्या जमीन प्रकरणांच्या चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यात २०१५ ते २०२१ या काळात विविध देवस्थानांच्या जमिनी, इनामी जमिनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर नावावर करून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंबंधी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बीड तालुक्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिराची २६ एकर जमीन परस्पर नावे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या संबंधीचे फेरफार निकाल तत्काळ थांबविण्यात यावेत, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसुधार विभागाने जिल्ह्यातील खालसा झालेल्या इनामी जमिनी व देवस्थानच्या जमिनीचे सर्व निकाल, फेरफार व अन्य दस्तावेज, संबंधित जमिनी विक्री करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानग्या या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी सूचना मुंडे यांनी केली. यासंबंधी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी खालसा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती पद्धत वापरली, तसेच कागदोपत्री हेराफेरी करण्यात आली आहे का? देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी कुण्या एखाद्या अधिकाऱ्याशी संगनमत करून बेकायदेशीररीत्या खालसा दाखवून त्या परस्पर नावे करून घेणे ही बाब गंभीर असून, या सर्वच बाबींची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळलेल्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

Web Title: Order of inquiry into land cases made in illegal names