पीक कर्जाच्या परतफेडीला महिनाभराची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:10+5:302021-07-05T04:21:10+5:30

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : ३१ जुलैपर्यंत मिळाली मुदतवाढ बीड : राज्यभरात पीक कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. जे ...

One month extension on crop loan repayment | पीक कर्जाच्या परतफेडीला महिनाभराची मुदतवाढ

पीक कर्जाच्या परतफेडीला महिनाभराची मुदतवाढ

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : ३१ जुलैपर्यंत मिळाली मुदतवाढ

बीड : राज्यभरात पीक कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. जे शेतकरी जून अखेरपर्यंत परतफेड करतात त्यांनाच व्याज माफीची सवलत मिळते. मात्र यावेळी कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता आणखी एक महिना बँका जुन्या खातेदारांना पीक कर्ज देऊ शकणार आहेत.

राज्यभरात शेतकऱ्यांना ० टक्के दराने कर्ज मिळावे, यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेड ३० जूनच्या आत केली आहे अशा शेतकऱ्यांचे व्याज बँकांना सरकारमार्फत दिले जाते. परिणामी शेतकऱ्यांवर व्याजाचा बोजा पडत नाही.

मात्र यावेळी कोरोना परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. त्यातच अनेक कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उसाचे पैसेदेखील दिलेले नाहीत. यामुळे अनेक शेतकरी अजूनही मागील वर्षीच्या पीक कर्जाचे हप्ते भरू शकलेले नाहीत. मागील कर्जाची परतफेड केली नाही, तर नवीन कर्ज तर मिळत नाहीच , त्यासोबतच ३० जूनपर्यंत कर्ज न भरल्यास शेतकऱ्याला त्यावर ६ % दराने व्याज भरावे लागते. त्यामुळे आता या कर्ज परतफेडीला आणखी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Web Title: One month extension on crop loan repayment