शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:32+5:302021-06-01T04:25:32+5:30

बळिराजा अडकला वादाच्या भोवऱ्यात : विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात ...

Neighbors were killed in the agricultural dispute | शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

बळिराजा अडकला वादाच्या भोवऱ्यात : विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एका महिन्यात शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील क्षेत्रफळ हे जवळपास ६ लाख ५० हजार हेक्टर इतके आहे. खरीप हंगामातील पीक-पेरणीसाठी शेतीची मशागत, उन्हाळी कामे सुरू झाल्यापासून शेतीच्या वादाला अनेक ठिकाणी तोंड फुटतात. याप् रकरणात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतातील विविध मशागतीच्या वेळी हे वाद उफाळून येतात, तर शेतीच्या वादातून गंभीर गुन्ह्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे मशागत सुरू झाल्यानंतर शेतीच्या वादातून घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावांत जनजागृती करण्यात आली. आपसात वाद न घालता रीतसर महसूल विभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहनदेखील केले आहे.

मागील वर्षी शेतीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, तर बांध कोरणे, पोवळीवरील दगडं उचलणे, वाटणी पत्रावरून होणारे गुन्हे एप्रिल व मे महिन्यात जास्त झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी अनेक गुन्हे भावाभावांत, भावकीत किंवा शेजाऱ्यासोबत असतात. त्यामुळे या वादातून शत्रुत्व वाढत जाते. त्याचे पर्यवसान हे गंभीर गुन्ह्यात होण्याचीदेखील भीती असते. त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणे ही भांडणे गावात ज्येष्ठांसोबत बसून सोडवणे गरजेचे आहे, अन्यथा यामधून सर्वांचेच आर्थिक नुकसान होते. महसूल विभागानेदेखील या प्रकरणांमध्ये लक्ष घालून प्रकरणे निकाली काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करणे गरजेेचे आहे, अशी मागणी आहे. ... २०२० मे आणि जूनमधील शेतीच्या वादातून घडलेले गुन्हे

दुखापत करणे, जमावाकडून मारहाण व इतर -२२५

जीवघेणा हल्ला करणे -२०५ ...

मुळात जमिनीचे वाद हा विषय महसूल प्रशासनाचा आहे. मात्र, शेतीच्या वादातून गुन्हे घडले तर आम्ही योग्य ती कारवाई करतो. आमच्याकडे काही प्रकरणे आली तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचे आदेशदेखील ठाणेप्रमुखांना देण्यात आलेले आहे. नागरिकांनीदेखील विनाकारण वाद घालू नयेत.

-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड. ............ शेतीच्या मशागतीच्यावेळी शेजाऱ्यासोबत होणाऱ्या भांडणाचे प्रमाण या दोन महिन्यांत वाढले आहे. त्यामधून गुन्हेदेखील वाढतात. यासाठी आपसात वाद मिटवणे गरजेचे आहे. गुन्हे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.

Web Title: Neighbors were killed in the agricultural dispute