वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:28 IST2026-02-26T19:28:01+5:302026-02-26T19:28:43+5:30

अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई: चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Major Crackdown on Sand Mafia! Ambhora Police Seize Two Sand Hywas Heading to Ahilyanagar | वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कडा (जि. बीड): आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ठोंबळसांगवी नदीपात्रातून विनापरवानगी वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन हायवा पोलिसांनी पकडले असून, सुमारे ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी कारवाई काय?
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील ठोंबळसांगवी नदीपात्रातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळूचा अवैध उपसा करून ती वाळू अहिल्यानगर शहरात विक्रीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नदीपात्रात धाड टाकली. यावेळी वाळूने भरलेले दोन हायवा पोलिसांना आढळून आले.

३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत दोन हायवा आणि त्यातील वाळू असा एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस अंमलदार सतीश पैठणे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार भगवान देवकर, पोलीस अंमलदार सतीश पैठणे, हनुमंत खांडेकर आणि होमगार्ड तुषार वामन यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Major Crackdown on Sand Mafia! Ambhora Police Seize Two Sand Hywas Heading to Ahilyanagar