आरटीई प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:34+5:302021-07-24T04:20:34+5:30

बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के मोफत प्रवेश लटकलेलेच दिसत आहेत. प्रवेशासाठी ...

Fourth extension for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ

बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के मोफत प्रवेश लटकलेलेच दिसत आहेत. प्रवेशासाठी आता पुन्हा चौथ्यांदा ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे रखडलेले ६७७ प्रवेश होऊ शकणार आहेत.

या योजनेंतर्गत निवड झालेल्या बालकांची ११ जूनपासून प्रवेश प्रकिया सुरू झाली होती. प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ११ जुलै व नंतर पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तर आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत १३५५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे त्यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जन्मतारीख, जातीबाबत टॅब ॲक्टिव्हेट

निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांना प्रवेश देण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आलेली असली तरी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन त्वरित सबमिट करावेत. तसेच जन्मतारीख अथवा जातीबाबत टॅब ॲक्टिव्हेट करण्यात आलेला आहे. यामध्ये बदल करत असताना अपलोड करावयाच्या पत्रावर शिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस असणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांना आवाहन, यंत्रणेला सूचना

निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांना प्रवेश देण्याची मुदत ही ३१ जुलै असून त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे शाळा स्तरावरील प्रवेशाबाबत शाळांनी लवकरात लवकर पालकांना तारीख देऊन पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. राज्यातील काही शाळांनी काही विद्यार्थ्यांना अजून एकदाही तारीख दिलेली नाही, असे निदर्शनास येत आहे. सर्व जिल्ह्यांतील आरटीईचे काम पाहणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन प्रवेशाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

-----

बीड जिल्हा आरटीई प्रवेश स्थिती

निकषपात्र शाळा - २३३

जागा -२२२१

आलेले अर्ज -३९३८

सोडतीद्वारे निवड -२०१२

तात्पुरते प्रवेश - ११६२

निश्चित झालेले प्रवेश - १३५५

-----------

Web Title: Fourth extension for RTE admission