Beed Crime: बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या, शहरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:18 IST2026-01-06T18:17:34+5:302026-01-06T18:18:19+5:30
बीड शहरामध्ये एका कामगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. हे वृत्त शहरात पसरताच खळबळ उडाली.

Beed Crime: बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या, शहरात खळबळ
गुन्हेगारीमुळे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यात हत्येची आणखी एक घटना घडली आहे. एका कामगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खड्डा खोदत असताना मयतावर आरोपीने गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, हत्येचे वृत्त शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
बीड शहरातील अंकुश नगर परिसरात ही घटना घडली आहे. नगरपरिषदेकडून शहरात खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. नगरपरिषदेमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कामगार हर्षद शिंदे हे खड्डा खोदण्याचे काम करत होते.
खोदकाम सुरू असतानाच परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची बाब समोर आली. गोळीबारात जखमी झालेल्या हर्षद शिंदे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी परिसरातील लोकांचीही गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि हर्षद शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
विशाल सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने हर्षद शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. हर्षद शिंदे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र, बीड शहरात भरदिवसा हत्या करण्यात आल्याच्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.