दुबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली 'वेगाची राणी'; लॅम्बोर्गिनीची ही सुपरकार बुलेट ट्रेनलाही देईल टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:58 IST2026-02-21T14:57:21+5:302026-02-21T14:58:34+5:30
Dubai Police Lamborghini: दुबई पोलिसांनी त्यांच्या ताफ्यात मैन्सरी कस्टमाईज्ड लॅम्बोर्गिनी रेवुएल्टो सुपरकार समाविष्ट केली आहे. जाणून घ्या या कारची वैशिष्ट्ये आणि वेग.

दुबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली 'वेगाची राणी'; लॅम्बोर्गिनीची ही सुपरकार बुलेट ट्रेनलाही देईल टक्कर
दुबई: जगभरातील सर्वात आलिशान आणि हाय-टेक गाड्यांच्या ताफ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबई पोलिसांनी आता आपल्या ताफ्यात आणखी एका महाबली सुपरकारचा समावेश केला आहे. प्रसिद्ध ट्यूनर 'मैन्सरी' कडून कस्टमाईज केलेली Lamborghini Revuelto आता दुबईच्या रस्त्यांवर गुन्हेगारांचा पाठलाग करताना दिसेल.
पॉवरफुल इंजिन: या कारमध्ये ६.५ लिटरचे V12 इंजिन आहे. जे तीन इलेक्ट्रिक मोटर्ससह मिळून तब्बल १,०१५ हॉर्सपावरची प्रचंड ताकद निर्माण करते. ही कार अवघ्या २.५ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडू शकते. याची कमाल मर्यादा ताशी ३५० किलोमीटर इतकी आहे, जी अनेक बुलेट ट्रेन्सपेक्षाही अधिक आहे.
कारचे वजन कमी ठेवण्यासाठी आणि मजबूती वाढवण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे.
खास दुबई पोलिसांसाठी डिझाइन
मैन्सरीने या कारला दुबई पोलिसांच्या सिग्नेचर पांढऱ्या आणि गडद हिरव्या रंगात रंगवले आहे. कारवर मैन्सरीचा बॅज आणि नवीन कार्बन स्प्लिटर, साइड स्कर्ट्स आणि विशेष फिन्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचे एरोडायनामिक्स अधिक सुधारले आहेत.
जगातील सर्वात महागडा पोलीस ताफा
लॅम्बोर्गिनी रेवुएल्टोच्या समावेशामुळे दुबई पोलिसांचा ताफा अधिक शक्तिशाली झाला आहे. त्यांच्या ताफ्यात आधीच बुगाटी वेरॉन, ऍस्टन मार्टिन One-77, बेंटले कॉन्टिनेंटल GT, लेम्बोर्गिनी एवेन्टडोर आणि फेरारी FF सारख्या कोट्यवधींच्या गाड्यांचा समावेश आहे.