World Buddhist Dharma Conference to be held in Aurangabad | औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती
औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती

औरंगाबाद : दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद होत असून, तिला
देश-विदेशातून एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर यांनी बुधवारी दिली.

राज्याचे उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि थायलंडच्या उद्योजिका रोजना व्हॅनिच कांबळे यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे.
या परिषदेसाठी जपान, थायलंड, नेपाळ, चीन, कोरिया, मलेशिया, श्रीलंका, जपान, भूतान, ब्रह्मदेशांसह विविध देशांतून भिक्खू व बुद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक येणार आहेत. विदेशातील किमान १५० भिक्खू व देशातील ३०० भिक्खू परिषदेला हजर राहतील. श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे शुक्रवारी उद्घाटन होईल. त्यावेळी १३ देशांतील प्रमुख भिक्खू, विचारवंत उपस्थित असतील.

शनिवारी भिक्खूंसाठी होणाऱ्या सत्रास दलाई लामा मार्गदर्शन करतील. विदेशातून आलेले भिक्खू विचारांचे अदान-प्रदान करतील. रविवारी सकाळी दलाई लामा पीईएस मैदानावर जनसमुदायाला मार्गदर्शन करतील. परिषदेत अनेक परिसंवाद होणार आहेत. पत्रकार परिषदेस भदन्त विनय रखित्ता थेरो, भदन्त ज्ञानबोधी, डॉ. अरविंद गायकवाड, कस्टम मुंबईचे आयुक्त मेश्राम, निवृत्त सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, कृष्णा भंडारे, यशंवत भंडारे, यशवंत कांबळे, राजेश काळे उपस्थित होते.

पूर्वापार बौद्धभूमी आहे औरंगाबाद
औरंगाबाद ही पूर्वापार बौद्धभूमी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांसह औरंगाबाद बुद्धलेणी, पितळखोरा बुद्धलेणी हे त्याचे प्रतीक आहे. या भूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
ही कर्मभूमी जगाने पाहवी या उद्देशाने येथेच जागतिक धम्म परिषद भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लोकुत्तरा महाविहारचे अध्यक्ष भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी सांगितले.

Web Title: World Buddhist Dharma Conference to be held in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.