‘Home on the Island’; Houses in Satara area locked down due to rain water | ‘बेटावर घर’; पावसाच्या पाण्यामुळे सातारा परिसरातील घरे लॉकडाऊन

‘बेटावर घर’; पावसाच्या पाण्यामुळे सातारा परिसरातील घरे लॉकडाऊन

ठळक मुद्देया भागाच्या विकास कामांवर मनपाचा शून्य खर्च सांडपाण्यासह समस्यांचा डोंगर कायम

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : सातारा परिसरातील ऊर्जानगरालगतच्या साईनगराला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. घराबाहेर पडणे शक्य नसल्याने भीतीपोटी अनेक कुटुंबियांनी स्वत:लाच लॉकडाऊन करून घेतले आहे. मनपाचा अधिकारी व कर्मचारी चुकूनही लक्ष देत नसल्याचे ‘बेटावर घर’ असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. 

पावसाच्या पाण्यात बेडकाचा डरावडराव आवाज, डासांचा त्रास आणि  सरपटणारे प्राणीदेखील घर व बंगल्याच्या आवारात आढळत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या काळात येथील नागरिकांना स्वत: जाऊन हक्काने गाºहाणे मांडता येत होते; परंतु आता मनपा कार्यालयात सांगूनही कोणी फिरकले नाही. औषध फवारणी करणारे कर्मचारीदेखील येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिक प्रवाह अनेक जागी खंडित केल्याने सिमेंटच्या जंगलात पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. मनपाच्या जेटिंग मशीनद्वारे पाणी उपसा करून परिसर स्वच्छ करण्याची विनंती येथील नागरिकांनी केली आहे; परंतु त्यांच्या प्रश्नाला केराची टोपली दाखविली जात आहे. 

वसाहतीत दुरवस्था
बंगले आणि कॉम्प्लेक्समध्ये चार हजार लोकवस्ती असलेला हा परिसर दुर्लक्षित ठरला आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी रहदारीला अनेक अडसर होताना दिसत आहेत. रस्ते झाले; परंतु ड्रेनेजचे सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. मानवी वसाहतीतील दुरवस्था कधी दूर होणार, असा सवाल नामदेव बाजड यांनी उपस्थित केला आहे.

कुटुंबाची चिंता
बायपास, तसेच इतर वसाहतींचे पाणी साईनगरात येऊन साचले आहे. एखाद्या बेटावर असल्याचा भास आता होऊ लागला आहे.
 - आनंद कुलकर्णी 

लॉकडाऊन झालोय
पावसाच्या पाण्याचा प्रवाह थांबला असून, साईनगरातील घरे पाण्यात जात आहेत. दारासमोर कठीण अवस्था असून, कुणीही मदतीला फिरकत नाही.  - संजय गडाख 

आरोग्याला धोका
रस्ते झाले; परंतु सांडपाण्याचे काय, असा प्रश्न आहे. आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 
- प्रवीण कुलकर्णी

Web Title: ‘Home on the Island’; Houses in Satara area locked down due to rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.