वन्यप्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:16+5:30

जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

The wildlife took a deep breath | वन्यप्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

वन्यप्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

ठळक मुद्देवरुडा जंगलात लावले तीन गेट : मानवी हस्तक्षेप टळणार, वनविभागाचे पाऊल

अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क     
पोहरा बंदी : चिरोडी वर्तुळातील प्राण्यांचे वास्तव्य असणाऱ्या वरूडा जंगलातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीन लोखंडी गेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
या जंगलात चारा, पाणी मुबलक असल्याने वन्यप्राण्यांना पोषक असे वातावरण असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. या जंगलात सफारीदरम्यान पर्यटकांना बिबट्यासह वन्यप्राणी पहावयास मिळत होते. म्हणूनच आठवड्याच्या प्रत्येक रविवारी वरूडा जंगल पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात होता. वरूडा जंगल अधिवासाकरिता अनुकूल असल्याने या जंगल भागात वन्यजीवाचा अधिवास सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी व मानवी हस्तक्षेपाला लगाम लावण्याकरिता चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वरूडा बीटचे वनरक्षक अतुल धस्कट, वनमजूर शालिक पवार यांनी तेथील तीन मुख्य रस्ते लोखंडी गेट लावून बंद केले आहे. जंगलात मुख्य रस्त्याच्या ‘टी पॉईंट’वर एक ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला असून, या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेल्या वन्यप्राण्यांची दरदिवशी नोंद घेतली जात आहे.
या वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी दोन कृत्रिम पाणवठे, दोन वनसंरक्षण कुटी, वनतळ्यांमध्ये विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू असून, कृत्रिम पाणवठ्याची नियमित स्वच्छता केली जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The wildlife took a deep breath